कसारा घाटात रेल्वे लाईन वर दरड कोसळली !
मुंबईला जाणारी रेल्वे वाहतुक काही काळ विस्कळीत !
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी परिसरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कसारा घाटात असलेल्या बोगद्याबाहेर रेल्वे लाईनवर दरड कोसळली आहे. या घटनेमुळे या मार्गावरून जाणाऱ्या अनेक रेल्वे गाड्या प्रभावित झाल्या आहे. सकाळच्या सुमारास पंचवटी एक्सप्रेस पास झाल्यानंतर काही वेळातच ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. प्रशासनाच्या वतीने दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

इगतपुरी भागात गेल्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पावसाची संततधार सुरु आहे. या पावसाच्या संततधारेमुळे नाशिक मुंबई महामार्गावर खड्डे पडल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून नाशिक ते मुंबई या चार तासांच्या प्रवासासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे मुंबईला येजा करण्यासाठी अनेक प्रवासी रेल्वेचा आधार घेत आहे. मात्र, शनिवार दि. ३ रोजी मुसळधार पावसामुळे इगतपुरी हद्दीतील कसारा घाटात पूल नंबर १२९/९ ते १३०/१ या भागात दरड कोसळण्याची घटना घडली आहे. ही दरड कोसळण्या पूर्वी काही वेळा अगोदरच मनमाड – मुंबई पंचवटी एक्सप्रेस या ठिकाणावरून निघून गेली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरड कोसळल्याची घटना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत रुळावर पडलेले मोठमोठे दगड व माती काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे. ज्या भागातून दगड, माती पडली त्याच्या आसपास मोकळे झालेले दगड काढून घेण्याचे काम सध्या सुरू आहे.
दरड काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू – या घटनेनंतर मुंबईकडे जाणाऱ्या काही गाड्या मनमाड, नाशिक रोड, देवळाली, लहवित स्थानकावर थांबण्यात आल्या होत्या. कसारा घाट क्षेत्रात तीन रेल्वे ट्रॅक असल्याने इतर दोन रेल्वे ट्रॅक वरून गाड्या हळुवार सोडण्याचे काम सुरू आहे.
गेल्या २४ तासांपासून इगतपुरी व कसारा घाटात मुसळधार पाऊस सुरु असल्याने मध्य रेल्वेच्या इगतपुरी येथील कसारा घाटातील दोन नंबर बोगद्याच्या तोंडावर शनिवार दि. ३ रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास दरड कोसळली. ही दरड कोसळताना ती ओव्हरहेड वायरवर पडल्याने ओव्हरहेड वायर ही क्षतिग्रस्त होऊन तुटली आहे. यामुळे मुंबईला जाणारी अप मार्गाची वाहतूक मिडल लाईनवरून वळवण्यात आल्याने मुंबईला जाणारी रेल्वे वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती. दरड हटविण्याचे व ओव्हर हेड वायर दुरुस्त करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून, अप लाईन सुरळीत होण्यासाठी अजून पाच ते सहा तास लागण्याची शक्यता रेल्वे प्रशासनाने वर्तवली आहे.





