अवैध धंदे चालकांसोबत वाढदिवस साजरा करणे भोवले !
उपनिरीक्षक विजय कोठावळे यांची उचलबांगडी !
नाशिक : वणी पोलीस ठाण्यात अवैध धंदे चालकांसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाची उचलबांगडी करून त्याला नियंत्रण कक्षात बसविण्यात आले आहे. या कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे आभार मानले आहे. तर या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यापुढे पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अशा विघातक प्रवृत्तींसोबत कोणीही वाढदिवस साजरा करू नये म्हणजे झाले.
वणी पोलिस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे यांचा वाढदिवस वणी परिसरातील अवैध दारू तस्करांनी वणी पोलीस ठाण्यामध्ये साजरा केला. इतकेच नाहीतर या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल करून आपले हितसंबंध आणि वजन दाखविण्याचा एकप्रकारे प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकारामुळे पोलीस खात्याची प्रतिमा चांगलीच डागाळली होती. याबाबत माध्यमांमध्ये सचित्र वृत्त देखील प्रसारित झाले होते. यामुळे ग्रामीण पोलीस दलासह वणी पोलिसांची इभ्रत चांगलीच वेशीला टांगली गेली होती.
त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या वृत्ताची दखल घेत वणी पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक विजय कोठावळे याची तात्काळ उचलबांगडी करीत नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. तसेच, ज्या संशयितांनी हा वाढदिवस साजरा केला ते संशयित देखील परिसरातून गायब झाल्याची चर्चा रंगली आहे. या कारवाईचे वणी गावातील गावकऱ्यांनी स्वागत केले असून, गावातील आणि आजूबाजूच्या परिसरातील अवैध धंदे बंद करण्याची देखील मागणी केली आहे.





