सामान्य विद्यार्थी असामान्य कामगिरी करू शकतात – आ. सत्यजित तांबे
नाशिक : (विशेष प्रतिनिधी) तरूण ऐक्य मंडळ, पंचवटी संचलित श्रीराम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ शुक्रवारी (दि.१९) उत्साहात संपन्न झाला. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव आमदार सत्यजित तांबे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. आपली शाळा सर्वसामान्य विद्यार्थ्यांची आहे असे समजल्यानंतर मला मनोमन आनंद झाला. कारण सामान्य विद्यार्थी हेच असामान्य कामगिरी करू शकतात असा इतिहास सांगतो. त्यामुळे आपण कोणत्या घरात जन्म घेतलाय, आपले आई-वडील कोण आहे हे आपल्या हातात नाही. मात्र आपले कर्म आपल्या हातात आहे. भरपूर मेहनत घ्या, शिक्षण घ्या आणि खूप मोठी कामगिरी करून दाखवाल, अशी अपेक्षा आ. तांबे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.
आ. तांबे म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी जाणीवपूर्वक पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समाजामध्ये महिला या मोठ्या संख्येने पुरुषांच्या बरोबरीने पुढे जात आहेत असे चित्र दिसते. ही अभिमानाची बाब आहे. मुलांनी आपली शैक्षणिक कारकीर्द उज्वल करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपले शिक्षक आणि आई-वडील हे आपणास मार्गदर्शन करत असतात. त्यांनी सांगितलेल्या योग्य त्या गोष्टींचा विचार करून आपल्या आयुष्यातील निर्णय घेतले पाहिजेत. नेहमी सूचना देणाऱ्या माणसांचा आपण चुकीच्या पद्धतीने विचार करतो. पण आपले आई-वडील आणि शिक्षक हे आपल्या भविष्यासाठी उत्तम असेच मार्गदर्शन करतात यावर विश्वास ठेवा, असेही नमूद केले.
या कार्यक्रम प्रसंगी ८०% पेक्षा जास्त गुण मिळविलेल्या पन्नास विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य सुधीर नवसारे यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय देविदास वाणले यांनी करून दिला. तरुण ऐक्य मंडळाचे सचिव बाबुराव मुखेडकर यांनी पाहुण्यांचा सन्मान केला. याप्रसंगी तरुण ऐक्य मंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर देवदत्त मुखेडकर, माजी प्राचार्य सुरेश शिंदे, उपमुख्याध्यापक उमेश आटवणे, पर्यवेक्षक काशिनाथ जोपळे यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता दहावी व बारावीचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते.





