गुन्हेगारी वाढल्याने शहर पोलीस दलात बदलाचे वारे ! - CHECKMATE NEWS
नाशिक

गुन्हेगारी वाढल्याने शहर पोलीस दलात बदलाचे वारे !


अनेक वरिष्ठ निरीक्षकांची होणार उचलबांगडी !

देवानंद बैरागी 

शहरात वाढलेली गुन्हेगारी बघता पोलीस आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसत आहे. गुन्हेगारी आटोक्यात आणण्यात अपयशी झालेल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी करून त्यांच्या जागी नव्या दमाचे कारभारी देण्याची प्रक्रिया सुरु झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे कोणत्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी होणार याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. 
           गेल्या काही दिवसांपासून शहरात खुनाचे सत्र सुरु झाले आहे. त्यातच हातात कोयते घेऊन दहशत माजविणे, जबरी लूट, चैन स्नॅचिंग, घरफोडी, दुचाकी चोरी या गुन्हेगारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात शहरात अवैध धंदे वाढले असून याविरोधात आवाज उठविणाऱ्या माध्यम प्रतिनिधींना थेट पोलीस ठाण्याबाहेर मारहाण करण्याचे प्रकार घडू लागले आहे. यामुळे शहराची कायदा सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर गेल्याचे दिसू लागले असल्याने नाशिककरांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 
            पोलीस प्रशासनाच्या अशा ढिसाळ कारभारामुळे शहरात वाढलेल्या गुन्हेगारीचे वाभाडे नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून काढण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे ॲक्शन मोडमध्ये आले असून शहरातील जवळपास आठ ते नऊ पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येणार असून त्याबाबत चाचपणी देखील सुरु करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये नव्याने बदलून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस ठाणे मिळविण्यासाठी फिल्डिंग लावणे सुरु केल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात शहरातील बहुतांश पोलीस ठाण्यांना नवे कारभारी मिळणार यात शंका नाही. 

Translate »
error: Content is protected !!