निर्व्यसनी शिक्षकाला पोलिसांकडून बेदम मारहाण ! - CHECKMATE NEWS
क्राईम

निर्व्यसनी शिक्षकाला पोलिसांकडून बेदम मारहाण !


वाहन चालविता येत नसताना केली ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई !

नाशिक : सराईत गुन्हेगारांना कायद्याची खडानखडा माहिती असल्याने त्यांना हात लावायची हिंमत पोलिसांकडून केली जात नाही. मात्र, या उलट आपल्या वर्दीचा दुरुपयोग करून थेट सर्वसामान्य नागरिकांच्या अंगाची सालपटे काढण्याचे काम काही बेजबाबदार आणि मुजोर अशा पोलीस कर्मचाऱ्यांकडून केले जात आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा सर्वसामान्य नाशिककारांमध्ये मोठी मलीन होत आहे. अशाच पद्धतीने नाशिकरोड पोलीस ठाण्यातील दोघा बिट मार्शलानी एका शिक्षकाला आणि त्याच्या नातेवाईकाला बेदम मारहाण करीत खोटा गुन्हा दाखल केल्याची घटना उघड झाली आहे. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेविरोधात पीडित शिक्षकाने थेट पोलीस उपायुक्त यांच्याकडे तक्रार करीत दोषी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. वरिष्ठ अधिकारी या मुजोर कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतात याकडे नाशिककरांच्या नजरा लागल्या आहे. 

            याबाबत अधिक माहिती अशी कि, पीडित रमेश रामदास कवडे, रा. गोपाळ नगर, सिन्नर फाटा, नाशिकरोड हे ३० जून रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान त्यांचे शालक जालिंद्र उगले यांच्यासह सिन्नर फाटा याठिकाणी पानसुपारी घेण्यासाठी आले होते. यावेळी याठिकाणी बिट मार्शल गीते आणि साबळे यांनी कुठलेही कारण न देता थेट सराईत गुन्हेगाराला मारावे तशा पद्धतीने काठीने मारहाण सुरु केली. याबाबत विचारणा केली असता या दोघांनी अधिक मारहाण केली. या मारहाणीमुळे कवडे यांच्या पाठीवर आणि पायावर जबर मुका मार लागला. तसेच, या मारहाणीमुळे त्यांच्या अंगावर लाल, काळे, निळे वळ उमटले. त्यानंतर हे बिट मार्शल इतक्यावरच थांबले नाहीतर त्यांनी कवडे आणि उगले यांना पोलीस ठाण्यात घेऊन जात दोन ते तीन तास बसवून ठेवले. तसेच, कवडे यांच्याविरोधात मद्य सेवन करून दुचाकी चालविल्याप्रकरणी ड्रंक आणि ड्राइव्ह बाबत कारवाई केली. 
            या घटनेने व्यथित झालेल्या रमेश कवडे यांनी थेट पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांच्याकडे तक्रार करीत खाकी वर्दीचा गैरवापर करून सामान्य नागरिकाला नाहक मारहाण करून खोटा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी चौकशी करून कठोर कारवाईची मागणी केली आहे. या घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाविषयी मोठी नाराजी पसरली आहे. तसेच, चुकीच्या पद्धतीने नागरिकांना मारहाण केल्याने पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये देखील खदखद व्यक्त केली जात आहे. 
यापूर्वी देखील एप्रिल महिन्यात रस्त्यावर हारकडे विकणाऱ्या योगिता रामदास हरणे या महिलेला वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी पोलीस ठाण्यात मारहाण केली होती. सकाळपासून संध्याकापर्यंत पोलीस ठाण्यात बसवून या महिलेला एकप्रकारे क्रूर वागणूक दिल्याचा संतापजनक प्रकार घडला होता. जबर मारहाण झाल्याने पीडित योगिता हरणे या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी देखील दाखल झाल्या होत्या. या घटनेने धास्तावलेल्या महिलेने याबाबत तक्रार करून देखील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कुठलीच कारवाई करण्यात आलेली नाही. सामान्यांना मारहाण करून काहीच कारवाई होत नाही हे बघूनच बहुदा या कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांची री ओढली असावी अशी चर्चा सुरु झाली आहे. 
सराईत गुन्हेगाराला देखील अटक करून न्यायालयात हजर केले जाते. न्यायालयाने संशयिताला पोलीस कोठडी दिली तरच पोलिसांना मानव अधिकाराच्या मर्यादा राखून संशयिताला पोलिसी खाक्या दाखविता येतो. मात्र, सर्वसामान्य नागरिकांविरोधात कुठलाही गुन्ह दाखल नसताना थेट रस्त्यावर मारण्याचा हक्क पोलीस कर्मचाऱ्यांना दिलाच कोणी असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आता अशा मुजोर कर्मचाऱ्यांवर वरिष्ठ अधिकारी काय कारवाई करतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 
मी माध्यमिक शिक्षक असून मला मद्यपाण करण्याचे व्यसन नाही, तसेच, मला दुचाकी किंवा चारचाकी वाहन चालविता येत नाही. माझे शालक हे धार्मिक वृत्तीचे आहे. त्यांना देखील कुठलेही व्यसन नाही. तरी देखील बिट मार्शल गीते आणि साबळे यांनी कारण नसताना नाहक मारहाण करीत खोटे गुन्हे दाखल केले आहे. अशा मुजोर कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. : रमेश कवडे, पीडित शिक्षक 

Translate »
error: Content is protected !!