कारागृहातुन सुटताच मिरवणूक काढणे पडले महागात ! - CHECKMATE NEWS
क्राईम

कारागृहातुन सुटताच मिरवणूक काढणे पडले महागात !


सराईत संशयित गुन्हेगार हर्षद पाटणकर पोलिसांच्या ताब्यात !

नाशिक : नाशिक शहरातील संशयित गुन्हेगार तुरूंगातून सुटताच त्याची शहरातून मिरवणूक काढण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेमुळे शहरात गुंडाराज सुरु असल्याचे दिसत असल्याने सर्वसामान्य नाशिककरांनी आपली नाराजी व्यक्त करीत पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराविरोधात संताप व्यक्त केला होता. यानंतर पोलिसांनी कारवाई करीत यातील संशयितासह त्याच्या साथीदाराला गजाआड केले असून त्यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
             गेल्या काही दिवसांपासून एम. पी. डी. ए. अन्वये नाशिकच्या जिल्हा कारागृहात गजाआड असलेला संशयित हर्षद सुनील पाटणकर याला न्यायालयाने जामीनावर मुक्त केले होते. पाटणकर जामीनावर बाहेर येताच त्याच्या साथीदारांनी सामान्य नाशिककारांमध्ये आपली दहशत निर्माण करण्याच्या हेतूने गुरुवार दि. २३ रोजी बेथिल नगर ते डॉ. आंबेडकर चौक, साधु वासवानी रोड, शरणपुर परिसरात चारचाकी वाहनातून मिरवणूक काढली होती. यावेळी या चारचाकी वाहनाच्या मागे अनेक दुचाकीवर टवाळखोरांनी कर्णकर्कश हॉर्न वाजवत आणि अश्लील भाषेत घोषणा देत आपली दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. या मिरवणुकीमध्ये अनेक दुचाकीस्वार हे ट्रिपल सीट आणि विना हेल्मेट दिसून येत होते. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली होती. 
           या घटनेची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या संशयितांवर कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संशयित हर्षद सुनिल पाटणकर, २५, रा. बोधलेनगर शरणपुररोड, नाशिक आणि नरेश उर्फ पवन माणिक कसबे,३१, रा. यशराज प्राईड ध्रुव नगर, नाशिक या संशयितांना ताब्यात घेतले. तसेच, ज्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली ती महिन्द्रा एक्स यु व्हि क्रमांक एम.एच १५ – जी.
एक्स. ८७२१ हि देखील जप्त केली आहे. 
               हि कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, पोउनि चेतन श्रीवंत, श्रेणी पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रवीण वाघमारे, संदीप भांड, प्रदिप म्हसदे, विशाल काठे, प्रशांत मरकड, नाझीमखान पठाण, शरद सोनवणे, धनंजय शिंदे, रमेश कोळी, पोना मिलींदसिंग परदेशी, विशाल देवरे, पोअं. मुक्तार शेख, जगेश्वर बोरसे, चालक समाधान पवार अयांनी केली. 
हर्षद पाटणकर याच्या गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी त्याला २०२२ मध्ये नाशिक शहर व नाशिक ग्रामीण हददीतुन हददपार करण्यात आले होते. मात्र, हर्षद पाटणकर याने हद्दपार कालावधी मध्ये पुन्हा गुन्हेगारी कृत्य चालु ठेवुन जनजिवन विस्कळीत केले होते. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करुन देखील त्याच्या वागण्यामध्ये कोणत्याही प्रकारे सुधारणा होत नसल्याने पोलीस आयुक्तांनी त्याला मध्यवर्ती कारागृह येथे एम. पी.डी.ए. अन्वये स्थानबध्द करण्याचे आदेश दिले होते. संशयित हर्षद सुनिल पाटणकरच्या विरोधात सरकारवाडा, पंचवटी, गंगापुर, इंदिरानगर, उपनगर पोलीस ठाण्यांमध्ये घातक हत्यारांनी जबर दुखापत करणे, चोरी, घरफोडी चोरी, शिवीगाळ आणि दमदाटी करुन लुटमार, खुनाचा प्रयत्न, मालमत्तेचे नुकसान, मनाई आदेशाचे तसेच हददपार आदेशाचे उल्लंघन, विनापरवाना शस्त्र बाळगुन गुन्हे करणे, जबरदस्ती घरात घुसणे, स्फोटक पदार्थाद्वारे नुकसान करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

Translate »
error: Content is protected !!