कांदा निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रयत्नशील : उपमुख्यमंत्री अजित पवार
अजित पवारांच्या हस्ते ५३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन !
पुणे : आळंदी, खेड आणि चाकण येथील ५३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अजित पवारांनी पुण्यातील चाकण येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित केले. कांदा निर्यातबंदी संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी स्वतः शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील चाकण येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात सहकारी आणि नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची प्रेरणा घेऊन समाजातील एकता, समता व बंधुता टिकवण्यासाठी आपण नेहमी एकत्र राहून लोकहित साधावे, असे आवाहन पवार यांनी केले. अजित पवार यांच्या हस्ते दिवसभरात आळंदी, खेड आणि चाकण येथे ५३६ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
ज्यामध्ये आळंदी नगर परिषद शाळेसाठी ५ कोटी रुपये आणि चाकन उप औषधालयाच्या विस्तारासाठी ९५ कोटी रुपयांचा समावेश आहे. याशिवाय, कॅन्सर रुग्णालयासाठी १० कोटी, जलपुरवठा योजनेसाठी १६२ कोटी आणि किल्ले पुनर्बांधणीसाठी २.६७ कोटींचा निधी दिला आहे. राज्याच्या आर्थिक विकासासाठी ५० हजार कोटींच्या योजनांची त्यांनी घोषणा केली असून, पुणे मेट्रो चाकणपर्यंत आणण्याचे आपले पुढील ध्येय असून ते लवकरच पूर्णत्वास आणण्याचं आश्वासन त्यांनी दिले. कांदा निर्यातबंदी संदर्भात शेतकऱ्यांच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी स्वतः शेतकऱ्यांच्या हितासाठी कायम प्रयत्नशील असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन अजित पवार यांनी यावेळी केले. गणेशोत्सवाच्या काळात सामाजिक एकतेसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची महत्त्वपूर्ण परंपरा सर्वांनी पर्यावरण पूरक पद्धतीने साजरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यक्रमाला खेड आळंदी मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील, कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते. अजित पवारांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दिलीपराव मोहिते पाटील यांना समर्थन देण्याची विनंती केली. त्या आधी इंद्रायणी हॉस्पिटल आणि कॅन्सर इन्स्टिट्यूट येथे आयोजित कर्करोग जनजागृती कार्यक्रमात अजित पवार सहभागी झाले होते. कर्करोग उपचार आणि त्यासाठीच्या योजनांविषयी तज्ञांशी त्यांनी सखोल संवाद साधला.





