खासगी सावकार कुंडलवाल पिता-पुत्रांचे पाय खोलात ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

खासगी सावकार कुंडलवाल पिता-पुत्रांचे पाय खोलात !


कैलास कुंडलवाल आणि त्याच्या दोन मुलांविरोधात गुन्हे दाखल !
कुंडलवाल याच्या नातेवाईकांविरोधात गुन्हे दाखल होण्याची शक्यता !
नाशिक : खासगी सावकार कैलास कुंडलवाल आणि त्याच्या मुलाच्या विरोधात पंचवटी आणि गंगापूर पोलीस ठाण्यात अजून दोन खंडणी आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे कुंडलवाल याच्या कुटुंबियांचे पाय खोलात जाताना दिसत आहे. या खासगी सावकारांविरोधात अजूनही काही गुन्हे दाखल होणार असल्याची शक्यता पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. फिर्यादीची जमीन सासूच्या नावे करून घेतल्याने भविष्यात सासूला देखील संशयित आरोपी करण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे  कुंडलवाल सावकारांच्या अजून किती कुंडल्या पोलिसांच्या हाती येतात याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 
            खासगी सावकार कैलास कुंडलवाल आणि त्याचा मुलगा रोहित कुंडलवाल यांनी एका फिर्यादीला मुद्गलसह व्याजाचे पैसे परत घेऊन देखील पिस्टल दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी देत पन्नास लाखांची मागणी केली होती. तसेच, फिर्यादीच्या मुलीच्या अंगावर हात टाकून तिचा विनयभंग केला होता. याबाबत कुंडलवाल पिता-पुत्राविरोधात भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी रोहित कुंडलवाल याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून पिस्टल, एका आलिशान गाडी आणि काही कागदपत्र जप्त केले होते. सध्या त्याला बुधवार दि. १९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर कैलास कुंडलवाल हा फरार झाला आहे. या सावकार पिता-पुत्राच्या घरातून एक डायरी मिळाली असून त्यात जवळपास पन्नास ते साठ लोकांनां व्याजाने पैसे दिल्याचे नमूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
           यानंतर पोलिसांकडे कुंडलवाल यांच्या विरोधात तक्रारदार येण्यास सुरुवात झाली आहे. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्यात फिर्यादी यांनी गुन्हा दाखल केला आहे की, खासगी सावकार कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल, निखिल कुंडलवाल यांच्याकडून मार्च १९९९ मध्ये पाच लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर वेळोवेळी व्याजाची मागणी करून व्याजाची हप्त्याची तारीख चुकली म्हणून दंडापोटी आणि खंडणी वजा व्याजाची रक्कम म्हणून ८० लाख रुपये घेतले. तरी देखील मुद्दल, व्याज आणि दंड असे अजून ५० लाख रुपये फिर्यादीकडे मागितले. तसेच, फिर्यादीच्या पत्नीच्या माहेरच्या नावावर खरेदी केलेल्या जमिनीचे जबरदस्तीने संशयिताने त्याच्या आईच्या नावाने मुखत्यारपत्र करून घेत जमीन सासूच्या नावे करून घेतली. संशयित कैलास कुंडलवाल याने फिर्यादीचा मुलगा आणि मुलगी यांना किडनॅप करून मुलीकडे वाईट नजरेने बघून तिचा विनयभंग केला होता. फिर्यादीची चांदवड येथील जमीन जळजबरीने नावावर करून घेतली. फिर्यादीच्या पत्नीचे फंडाचे पैसे काढून घेतले, तसेच, फिर्यादीच्या पत्नी घरात असताना कैलास कुंडलवाल याने तिला व्याजाच्या पैशांसाठी शिवीगाळ करीत तिचा पदर ओढून अश्लील शब्द वापरून माझे व्याजाचे पैसे दे अशी मागणी करीत तिचे केस पकडून तिच्या गळ्यातील पाच तोळे वजनाची सोन्याची पोत हिसकावून घेतली. तसेच, त्यांचे सेवानिवृत्तीचे १० लाख रुपये जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी संशयित रोहित कुंडलवाल आणि निखिल कुंडलवाल यांनी फिर्यादीच्या मुलाला मारहाण करून फ्लॅट विकण्यास आणि पत्नीचे दागिने गहाण ठेवून, एलआयसी पॉलिसीवर कर्ज काढून पैसे घेतले. तसेच, पिस्टलचा धाक दाखवून फिर्यादीच्या मुलाची सोन्याची अंगठी आणि ३ लाख रुपये काढून घेतले. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
            तर दुसरा गुन्हा गंगापूर पोलीस ठाण्यात फिर्यादीने संशयित खासगी सावकार कैलास कुंडलवाल, रोहित कुंडलवाल, निखिल कुंडलवाल आणि दया कुमावत यांच्याविरोधात दाखल केला आहे. यामध्ये फिर्यादी यांनी जुलै २०२४ दरम्यान संशयित कैलास, रोहित आणि निखिल कुंडलवाल यांच्याकडून ४९ लाख ३६ हजार रुपये व्याजाने घेतले होते. दरम्यान संशयितांनी फिर्यादी यांच्याकडून व्याजापोटी आणि तारीख चुकली म्हणून दंडापोटी ५२ लाख रुपये वसूल केले होते. तरी देखील मुद्दल, व्याज आणि दंड असे अजून ६४ लाख ३६ हजार रुपयांची मागणी सुरु केली होती. तसेच, रोहित कुंडलवाल याने फिर्यादीच्या घरी येऊन तुझ्या नवऱ्याने पैसे दिले नाही आणि तो नाशिकमध्ये दिसला तर त्याला गोळी मारून ठार करण्याचं धमकी देत फिर्यादीला अश्लील भाषेत शिवीगाळ करीत तिच्या कमरेवर लाथ मारून निघून गेला होता. त्यानंतर रोहित आणि निखिल कुंडलवाल यांनी एका हॉटेलमध्ये येऊन फिर्यादीला आताच्या आता ६४ लाख ३६ हजार रुपये दे म्हणत निखिल कुंडलवाल याने फिर्यादीचा गळा दाबत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत तिच्या हातातील टन सोन्याच्या अंगठ्या काढून काढून घेतल्या. तसेच, मेहुणा दया कुमावत याच्या मोबाईलवरून खंडणीवजा व्याजाची रक्कम मागितली होती म्हणून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Translate »
error: Content is protected !!