सिनेस्टाइल पद्धतीने पुण्यातील सोने चोर नाशिकमध्ये जेरबंद ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

सिनेस्टाइल पद्धतीने पुण्यातील सोने चोर नाशिकमध्ये जेरबंद !


पुणे-नाशिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईमुळे सोनेचोर गजाआड !
सोने चोरून फरार होणाऱ्या आरोपीला नाशिकरोड येथे ठोकल्या बेड्या !
नाशिक : हद्दीचा वाद सोडला तर पोलीस प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी किती मोठी कामगिरी करू शकतात हे एका आरोपीला अटक केल्यानंतर सिद्ध झाले आहे. पुण्यातून सोने चोरे करून पश्चिम बंगाल मध्ये फरार होणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांच्या मदतीने सिनेस्टाइल पद्धतीने बेड्या ठोकण्यात आल्याची घटना नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर घडली आहे. या धडाकेबाज कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत असून पोलिसांवर शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात येत आहे. तर या चोरीच्या गुन्ह्यातील दुसऱ्या संशयिताला मुंबई भाईंदर येथून ताब्यात घेण्यात आले आहे. या दोन्ही संशयितांकडून लवकरच चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 
          पुणे शहरातील फरासखाना पोलीस ठाण्यात १८२/२४ बीएनएस-३०६,३(५) अन्वये ३२ लाख १६ हजार रुपये किंमतीचे ४८० ग्रॅम वजनाचे अर्धवट बनवलेले सोने नोकराने चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित अमित पाल हा मुंबई येथे असल्याची माहिती गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी मुंबई येथे जाऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र, संशयित आरोपी मुंबई येथून पश्चिम बंगाल येथे रेल्वे मार्गे पलायन करत असल्याबाबत माहिती मिळाली. ही माहिती मिळताच त्यांनी नाशिक सातपूर येथे कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक राकेश न्हाळदे यांना माहिती देत मदत मागितली. 
           आरोपीचे वर्णन घेत पोलीस उपनिरीक्षक राकेश न्हाळदे यांनी तात्काळ नाशिकरोड रेल्वे स्टेशन गाठत नाशिकरोड पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अजित शिंदे, पोलीस कर्मचारी दत्तात्रय वाजे आणि जीआरपीएफ पोलीस निरीक्षक सचिन बनकर आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने संशयित आरोपीचा शोध सुरु करीत फिल्मीस्टाईल पद्धतीने संशयित आरोपी अमित पाल याला ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. 
फरासखाना पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक अरविंद शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक मेहबूब मोकाशी, पोलीस हवालदार नितीन तेलंगे, पोलीस नाईक महेश राठोड, पोलीस कॉन्स्टेबल गजानन सोनुने हे संशयित आरोपीच्या शोधात मुंबईत पोहचले होते. त्यांनी भाईंदर येथून मुकेश काशिनाथ पंखीरा, २७, रा. अंबिका पॅलेस, सी-विंग, रूम नं.३११, भाईंदर पूर्व, मुळगाव पश्चिम बंगाल याला ताब्यात घेतले. यावेळी पळून जाण्याच्या तयारीत असलेला संशयिताला पकडण्यासाठी पथक रेल्वे स्थानकावर पोहचले असता रेल्वे अवघ्या काही मिनिटांपूर्वी निघाली होती. चारचाकी वाहनाने रेल्वेचा पाठलाग करणे शक्य नसल्याने नाशिक पोलीस आणि रेल्वे पोलिसांशी संपर्क करण्यात आल्यानंतर नाशिकरोड रेल्वे स्थानकावर संशयित अमित राबी पाल, २१, रा. अंबिका पॅलेस, सी-विंग, रूम नं.३११, भाईंदर पूर्व, मुळगाव पश्चिम बंगाल याला ताब्यात घेण्यात आले. 

Translate »
error: Content is protected !!