रस्त्यावरील खड्डयाने घेतला निष्पाप महिलेचा बळी ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

रस्त्यावरील खड्डयाने घेतला निष्पाप महिलेचा बळी !


शेकडो कोटी खर्च करूनही शहरात खड्ड्याचे साम्राज्य !

नाशिक : नाशिकच्या खड्डेमय रस्त्यांनी नागरिकांचे चालणे मुश्किल केले आहे. या रस्त्यांच्या झालेल्या चाळणी मुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच जत्रा चौफुली येथील रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी आदळून झालेल्या अपघातामध्ये एका निष्पाप महिलेला हकनाक आपला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी आणि संतापजनक घटना घडली आहे. या घटनेमुळे नशिकच्या खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

            सविता संजू शिरसाठ, ५०, रा. रॉयल रेसिडेन्सी, आडगाव शिवार, नाशिक असे या अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. सविता शिरसाठ आपल्या मुलाच्या दुचाकीवरून सीबीएस येथे जाण्यासाठी गुरुवार दि. ३ रोजी सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास निघाल्या होत्या. सविता यांची दुचाकी मुंबई आग्रा महामार्गवरील जत्रा चौफुली येथे आली असता, रस्त्यावर पडलेल्या एका खड्ड्यात दुचाकी आदळली आणि दुचाकीवर मागे बसलेल्या सविता शिरसाठ या रस्त्यावर पडल्या. यामध्ये सविता यांच्या डोक्याला मार लागून त्यांच्या नाकातून आणि कानातून रक्तस्त्राव सुरु झाला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांच्या मदतीने गंभीर जखमी झालेल्या सविता यांना उपचारासाठी खासगी रुग्नालयात दाखल करण्यात आले. 
               मात्र, सविता शिरसाठ यांच्यावर उपचार सुरु असतांना शनिवार दि. ५ रोजी त्यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार राकेश बनकर करीत आहे. या घटनेमुळे मयत सविता यांच्या कुटुंबियांनी नाशिक मनपाच्या गलठण कारभाराविषयी आपला संताप व्यक्त केला आहे. 
 मुंबई आग्रा महामार्गाचे गेल्या काही दिवसांपासून काँक्रिटीकरण करणे सुरु आहे. यामुळे आडगाव ते कन्नमावर पुलापर्यंत वाहतूक कोंडी होत आहे. तर बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर दररोज अनेक अपघात होत असून, अनेक नागरिक जखमी होत आहे. 
नाशिकमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून खड्ड्यावरून राजकारण सुरु आहे. मनपा प्रशासनाकडून खड्डे बुजवण्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा चुराडा करण्यात आला आहे. खड्डे बुजविण्याच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने शहरातील रस्ते पुन्हा खड्यात गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे शेकडो कोटी रुपये कोणाच्या घशात गेले याची चर्चा शहरांत सुरु झाली आहे. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे आता नागरिकांचा जीव जाऊ लागल्याने नाशिककरांमध्ये संतापाची लाट उसळू लागली आहे. त्यात सर्व राजकीय नेते मंडळी निवडणुकीच्या तयारीत व्यस्त असल्याने त्यांना सर्वसामान्य नाशिककरांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे दिसत आहे. 
मनपा प्रशासनाने शहरातील रस्ते चांगल्या उत्कृष्ट दर्जाचे करायला हवे. रस्त्यांना पडलेले खड्डे तात्काळ बुजवायला हवे. दोषी ठेकेदारांवर कारवाई व्हायला हवी. आज कारण नसताना सणासुदीच्या काळात आमच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. प्रशासनाच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि नित्कृष्ठ दर्जाच्या कामांमुळे नागरिकांचा जीव जाऊ लागला आहे. : महेश शिरसाठ, मयताचे नातेवाईक 

Translate »
error: Content is protected !!