पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग ! - CHECKMATE NEWS
क्राईम

पत्ता विचारण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीचा विनयभंग !


पोलीस कुंभकर्णाच्या भूमिकेत असल्याने गुन्हेगारीत वाढ !

नाशिक : पंचवटी परिसरात आपल्या वडिलांना जेवणाचा डब्बा देऊन घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्याने जाणाऱ्या मुलींचा अशा प्रकारे विनयभंग होत असताना पोलीस कुठे आहे असा प्रश्न यानिमित्ताने नागरिकांनी उपस्थित केला असून पोलिसांचा धाकच उरला नसल्याने असे कृत्य करण्यास गुन्हेगार धजावत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 

              शुक्रवार दि. २३ रोजी लामखेडे मळा परिसरात राहणारी पीडित अल्पवयीन मुलगी हि आपल्या वडिलांना जेवणाचा डब्बा देऊन पुन्हा घरी येत होती. रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास उमाशक्ती अपार्टमेंट समोर एका दुचाकीवर आलेल्या अज्ञात युवकाने पीडित मुलीस पत्ता विचारण्याचा बहाणा केला. यावेळी पत्ता माहित नसल्याचे पीडित मुलीने सांगतच या अज्ञात युवकाने पीडित मुलीस जवळ ओढून तिच्याशी अश्लील वर्तन करण्यास सुरुवात केली. याचवेळी बाजूच्या इमारतीमधील एका महिलेने हा सर्व प्रकार पाहून आरडाओरड केली. त्यामुळे संशयित युवकाने मोपेड दुचाकीसह पळ काढला. 
             या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून, याबाबत पीडितेच्या वडिलांनी पंचवटी पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. गजबजलेल्या परिसरात संशयित युवकाने पीडित मुलीचा विनयभंग केल्याने पंचवटी पोलिसांचा कुठलाही धाक उरला नसल्याचे यावेळी परिसरातील संतप्त नागरिकांनी सांगितले. या संशयितांचा तात्काळ शोध घेऊन त्याला गजाआड करावे अशी मागणी देखील यावेळी नागरिकांनी केली आहे. 
राज्यात मुलींची सुरक्षा धोक्यात आली असून, ठिकठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना उघडकीस येत आहे. यासाठी बदलापूर येथे स्वयंस्फूर्तीने नागरिक रस्त्यावर उतरून राज्य सरकारला धारेवर धरले होते. तर दुसरीकडे विरोधी पक्षाचे नेते रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आपली राजकीय पोळी भाजून घेत सरकारचा निषेध करीत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अधिक सतर्क राहणे गरजेचे असताना मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वजावट होण्याऐवजी वाढ होत असल्याने नागरिकांच्या रोषात अधिक भर पडत आहे.
गेल्या काही दिवसांपासून पंचवटी परिसरात अनेक गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली आहे. मेरी कंपाउंड परिसरात पोलिसांची कुठलीही गस्त नसल्याने याठिकाणी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. पोलिसांचा परिसरात आणि गुन्हेगारांवर कुठलाही वचक राहिला नसल्याने गुन्हेगारांचे चांगलेच फावले असून, हिरावाडी परिसरात गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदाराच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरटयांनी लंपास करीत पोलीस प्रशासनाला खुले आव्हान दिले होते. यासह घरफोडी, दुचाकी चोरी, भाविकांची लूटमार या घटना नित्याच्याच झाल्या आहे. यातील अनेक घटनांमधील गुन्हेगार मोकाट असून, पोलीस कुंभकर्णाच्या भूमिकेत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. 

Translate »
error: Content is protected !!