नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात १६ वर्षाचा मुलगा ठार !
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वानरवाडी गावातील एका मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची भयानक घटना घडली आहे. या बिबट्याच्या हल्ल्यात १६ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याची दहशत असून वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील वानरवाडी गावात विठ्ठल पोद्दार (१६, मूळ रा. भाद्रपाडा, गुजरात) हा गावातील बबन डमाळे यांच्या शेतात गुरुवार दि. २२ रोजी दुपारी गुरे चारण्यासाठी गेला होता. सायंकाळी गुरे घराकडे आल्या मात्र विठ्ठल आला नाही. म्हणून डमाळे यांनी त्याचा शोध घेतला असता, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात विठ्ठल जागीच ठार झाल्याचे दिसून आले. विठ्ठल बिबट्याच्या हल्यात मृत्युमुखी पडल्याने त्याचा छिन्नविछिन्न मृतदेह पाहून त्यांना मोठा धक्का बसला. बिबट्याच्या हल्ल्याची ही घटना सरपंच दत्तू भेरे यांनी पोलीस आणि वन विभागाला कळवली. यानंतर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करत विठ्ठलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला.
गेल्या दोन महिन्यांपासून या भागात बिबट्याची दहशत पसरली आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपले दैनंदिन शेतीची कामे दहशतीखाली करावी लागत आहे. त्यातच नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात विठ्ठलचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात बिबट्याची मोठी दहशत पसरली आहे. याठिकाणी पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





