संशयित प्रेयसीसह मारेकऱ्यांना पोलीस कोठडी !
२ लाखांची सुपारी देत केली होती प्रियकराची हत्या !
नाशिक : प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने सुपारी देत हत्या घडवून आणल्याची घटना उघडकीस आली होती. गगन कोकाटे हत्या प्रकरणातील पाच संशयितांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दोन अल्पवयीन संशयितांची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली आहे.

मेरी कंपाऊंड परिसरातील मराठा समाजाच्या वस्तीगृहाबाहेर सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कोकाटे यांचा लहान मुलगा गगन प्रवीण कोकाटे, २६, वृंदावन नगर, म्हसरूळ, नाशिक या याची मंगळवार दि. २० रोजी रात्री साडेआठ नऊ वाजेच्या सुमारास डोक्यात आणि मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. बुधवार दि. २१ रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती.
या हत्या प्रकरणात संशयित भावना सुशांत कदम, ४०, रा. वृंदावन नगर, म्हसरूळ, संकेत शशिकांत रणदिवे, २०, राधाकृष्ण नगर, अशोकनगर सातपूर, मेहफुज रशीद सय्यद, १८, रा. अशोकनगर सातपूर, रितेश दिलीप सपकाळे, २०, अशोकनगर सातपूर, गौतम सुनील दुसाने, १८, रा. शहीद सर्कल, गंगापूर रोड यांच्यासह दोन अल्पवयीन गुन्हेगारांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान संशयित भावना कदम हिने प्रियकर गगन कोकाटे हा त्रास देत असल्याने त्याला जीवे मारण्यासाठी दोन लाख रुपयांची सुपारी दिली असल्याची कबुली दिली होती.
या हत्या प्रकरणातील सर्व संशयितांना गुरुवार दि. २२ रोजी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने युक्तिवाद ऐकून घेत त्यांना रविवार दि. २५ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली असून दोघा अल्पवयीन संशयितांची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) ज्योती आमने करीत आहे.





२ लाखांची सुपारी देत केली होती प्रियकराची हत्या !