चिकन शॉपचे अज्ञातांकडून नुकसान ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

चिकन शॉपचे अज्ञातांकडून नुकसान !


दंगलीची धग अजूनही सुरूच !
नाशिक : जुन्या नाशिकमध्ये दोन धर्मियांमध्ये झालेल्या वादामुळे नाशिकची शांतता भंग झाली होती. यामद्ये पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत दंगल नियंत्रणात आणली असली तरी याची धग अजूनही दिसून येत आहे. पंचवटी परिसरातील हिरावाडी येथील एका चिकन शॉपचे अज्ञातांनी नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. चिकन शॉप बंद असल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असल्याची चर्चा परिसरात सुरु होती. या घटनेमुळे पंचवटी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्चचिन्ह उपस्थित केले जात आहे.
             शुक्रवार दि. १६ रोजी बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. मात्र या बंदला हिंसक वळण लागल्यानंतर जुन्या नाशिकमध्ये ठिकठिकाणी दगडफेक करीत वाहनांचे नुकसान करण्यात आले होते. तसेच, काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरावर आणि त्यांच्यावर हल्ले करण्यात आले होते. दुपारनंतर सुरु झालेल्या दगडफेकीच्या घटनेमध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक जखमी झाले होते. यातील काही गंभीर जखमींवर खासगी रुग्नालयात उपचार सुरु आहे.
              याबाबत मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी जखमींची भेट घेत विचारपूस केली होती. तसेच, संपूर्ण शहरातील परिस्थिती नियंत्रणाखाली असल्याचे सांगितले होते. मात्र, शुक्रवारी सुरु झालेल्या या वादाचे पर्यावसन शनिवार दि. १७ रोजी पंचवटी परिसरात दिसून आहे. हिरावाडी परिसरात असलेल्या पाटाजवळ रस्त्याच्या कडेला उघडयावर आसिफ खाटीक आणि रफिक कुरेशी यांचे चिकन तसेच मटण शॉप आहे. शनिवारी दुपारच्या सुमारास अज्ञातांनी या बंद असलेल्या दुकानात कोंबड्या ठेवायच्या जाळ्या पलटी करून दिल्या होत्या. यामध्ये या दुकानाच्या साहित्याचे नुकसान झाले असून, याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात शॉप मालकांनी माहिती कळविली होती. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, आजूबाजूचे रहिवाशी दहशतीखाली असल्याचे दिसत आहे.
सत्ताधारी आणि पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती आटोक्यात आणण्यात यश आले असून, सर्वत्र पोलीस बंदोबस्त असल्याचे सांगत आहे. मात्र, आता अशा पद्धतीने गनिमी कावा करून काही अज्ञातांकडून दुकानांना लक्ष केले जात असल्याचे दिसत आहे. यामुळे जुन्या नाशिकसह संपूर्ण नाशिक शहरात पोलिसांना अलर्टवर राहावे लागणार असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी देखील हिरावाडी परिसरात एका बेकरीचे नुकसान करण्यात आल्याची चर्चा परिसरात रंगली आहे. मात्र, याबाबत कोणीही बोलायला तयार नसल्याचे दिसत आहे. सलग दोन दिवस पंचवटी परिसरात तोडफोडीच्या घटना होत असताना देखील पोलिसांकडून कुठलीच खबरदारी घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Translate »
error: Content is protected !!