ग्रामीण पोलिसांनी केले जिल्ह्यातील अवैध धंदे उध्वस्त !
६४ लाखांचा मुद्देमाल जप्त ; विविध पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हे दाखल !
नाशिक : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण पोलीस दल अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील विविध गावांमध्ये असलेल्या अवैध व्यवसायांविरूध्द धडक कारवाई करण्यात आली असून, जवळपास ६४ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. यातील संशयितांविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
मंगळवार दि. १५ रोजी महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे बिगुल वाजले आहे. निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या अनुषंगाने नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अपर पोलीस अधीक्षक, मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवार दि. १५ पासून नाशिकच्या ग्रामीण भागात विविध अवैध धंद्यांवर छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये नाशिक ग्रामीण भागातील अतिदुर्गम डोंगराळ भागातील दऱ्या खोऱ्यांमध्ये हातभट्टीची गावठी दारू, अवैधरित्या मद्याची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या १३१ संशयितांविरोधात एकुण १३० गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामध्ये १२ लाख १५ हजार ४०८ रुपये किंमतीचा अवैध मद्यसाठा नाश करण्यात आला आहे. तसेच, अवैध गुटखा विरोधी केलेल्या कारवाईमध्ये वणी पोलीस ठाणे हद्दीत विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या पथकाने गुजरात राज्यातील अंकलेश्वर येथून मालवाहू ट्रक मध्ये शेत मालाच्या कॅरेटच्या मागे लपवून गुटख्याची अवैधरित्या तस्करी करणाऱ्या संशयितांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये २३ लाख ४० हजार रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि मालवाहू ट्रक असा एकुण ४३ लाख ६५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच मालेगाव शहरातील पवारवाडी पोलीस ठाणे, ओझर पोलीस ठाणे आणि जिल्हयातील इतर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा वाहतुकीसंदर्भात एकुण ६ गुन्हे दाखल करण्यात आले असून ७ संशयित आरोपींना अटक केली असून, त्यामध्ये ५ लाख ४५ हजार ८६९ रुपयांचा अवैध गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरलेली वाहने असे मिळुन ८ लाख ५३ हजार ८६९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. अशाप्रकारे निवडणुक आचारसहिता लागु झाल्यापासुन ३ दिवसात ६४ लाख ३४ हजार २७७ रुपये किमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई आगामी विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभुमीवर अवैध व्यवसायांविरोधात जिल्ह्यातील पोलीस ठाण्यातील हद्दीत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.





