लोक चंद्रावर जाऊन आले मात्र, मनपाचा व्हॉल्व चार वर्षांपासून येईना ! - CHECKMATE NEWS
नाशिक

लोक चंद्रावर जाऊन आले मात्र, मनपाचा व्हॉल्व चार वर्षांपासून येईना !


कमी वेळ आणि मुबलक पाणी पुरवठा होत नसल्याचा आरोप !

स्थानिक रहिवाश्यांनी केले अचानक आंदोलन !  

नाशिक : अनियमित आणि कमी पाणी येत असल्याच्या निषेधार्थ मखमलाबाद येथील रामकृष्ण नगर भागातील पाण्याच्या टाकी परिसरात स्थानिक संतप्त महिलांनी एकत्र येत ठिय्या आंदोलन केले. लोक चंद्रावर जाऊन आले मात्र, मनपाचा व्हॉल्व चार वर्षापासून येत नसल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिल्या. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे मनपा प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. यावेळी पंचवटी विभागाचे पाणी पुरवठा उपअभियंता नरेंद्र शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांशी चर्चा करत पाण्याची वेळ वाढवून देणार असल्याचे आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी आंदोलन मागे घेतले.
           उन्हाळ्यापासून या भागात पाणी कपात करण्यात आली आहे. मात्र, शहराला पाणीपुरवठा करणारे धरण शंभर टक्के भरलेले असताना देखील परिसरातील पाणी कपात कायम असल्याचा आरोप महिलांनी केला. शांतीनगर, पार्थ कॉलनी, रामकृष्ण नगर, एलआयसी कॉलनी, एरिगेशन कॉलनीसह नव्याने विकसित झालेल्या परिसरात कमी दाबाने आणि कमी वेळ पाणी पुरवठा होत आहे. कुटुंबातील सदस्यांना पुरेल एवढे देखील पाणी मिळत नसल्याचा आरोप आंदोलन करणाऱ्या संतप्त महिलांनी केला. 
            सप्टेंबर महिन्यात याच ठिकाणी स्थानिक नागरिकांनी आंदोलन केले होते. यावेळी अधिकाऱ्यांकडून आंदोलनकर्त्यांना देण्यात आलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने पुन्हा एकदा परिसरातील महिलांकडून शुक्रवार दि. १८ रोजी रात्री अचानक आंदोलन छेडण्यात आले. दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना महिलांना साफसफाईसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र महापालिकेच्यावतीने मुबलक पाणी मिळत नसल्याने घराची साफसफाई कशी करायची असा सवाल महिलांनी अधिकाऱ्यांना विचारला. जर टाकी पुर्ण क्षमतेने भरत नाही म्हणून पाणी कमी दाबाने व कमी वेळ सोडले जाते तर मग महापालिकेच्या माध्यमातून याच पाण्याच्या टाकीतून टॅंकर भरून इतर भागात पाणी पुरवठा का केला जातो असा प्रश्न देखील आंदोलनकर्त्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना विचारला. यावेळी महापालिका अधिकाऱ्यांनी पाणी पुरवठ्याची वेळ पंधरा मिनिटांनी वाढवून दिल्याचे सांगत तांत्रिक अडचण लवकरच दुर होऊन सुरळीत पाणी पुरवठा सुरू केला जाण्याचे आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
पहाटे पाणी सव्वा पाचला पाणी सुरु होते आणि पावणे सहा वाजता पाणी जाते. पहिले दहा मिनिटे फक्त हवाच येते. त्यामुळे आम्ही हवेचे पैसे भरायचे का ? अधिकाऱ्यांना बोलण्यास गेल्यास ते कायद्याची भाषा शिकवतात. आम्हाला देखील कायदा समजतो. लोक चंद्रावर जाऊन खाली आले. मात्र, यांचा व्हॉल्व चार वर्षांपासून येत नाही. पावसाळा असून देखील पाणी भेटत नाही. : स्नेहल गंभीरे, स्थानिक रहिवाशी 
स्थानिक प्रतिनिधी यांच्यासह अधिकाऱ्यांना अनेकदा निवेदन दिले. मात्र, स्थानिक अधिकारी आयुक्तांचा प्रॉब्लम सांगतात. मोटार लावली तर अरेरावी आणि दंडाची भाषा करतात. आम्हाला काम सोडून पाण्यासाठी धावपळ करावी लागते. पाण्याला कुठलेच प्रेशर नसते. मोटार लावल्याने लाईटबील देखील जास्त येत आहे. पाण्याचे बिल भरले नाहीतर नोटीस पाठवतात. आम्ही दुष्काळी भागात राहत नाही. तरी इतकी समस्या का ? : संगीता सूर्यवंशी, स्थानिक रहिवाशी
पाणी पंधरा ते वीस मिनिटे अधिक पाणी सोडणार आहे. फिल्टरेशनचे काम पूर्ण झाल्यावर पाणी पुरवठा सुरळीत होईल. काम पूर्ण व्हायला एक ते दीड वर्ष लागू शकते. काम पूर्ण झाल्याशिवाय पाणी पुरवठा सुरळीत होणे शक्य नाही. : नरेंद्र शिंदे, उपअभियंता, पाणी पुरवठा विभाग 

Translate »
error: Content is protected !!