गणेश गीतेची आत्महत्या !
कंपनीमध्ये लाखो रुपये अडकल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची चर्चा !
नाशिक : आर्थिक विवंचनेला कंटाळून पंचवटीतील लामखेडे मळा परिसरात राहणाऱ्या एका युवकाने गळफास आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. एका कंपनीमध्ये लाखो रुपये अडकल्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. मात्र, गणेश याने अशा प्रकारे आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित कंपनीविरोधात पोलीस कारवाई करणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश शंकर गीते, ३५, रा. गौरव रेसिडेन्सी, लामखेडे मळा, दिंडोरीरोड, पंचवटी या युवकाने गुरुवार दि. २१ रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास राहत्या घरी ओढणीने गळफास घेत आत्महत्या केली. यावेळी गणेश याचा भाऊ नवनाथ शंकर गीते याने जिल्हा रुग्नालयात दाखल केले असता येथील डॉक्टर गावित यांनी गणेश याला तपासून मृत घोषित केले.
गणेश गीते याने एका मल्टी लेव्हल कंपनीमध्ये आर्थिक लोभापोटी जवळपास बारा ते पंधरा लाख रुपये गुंतवले होते. मात्र, पैसे परत मिळत नसल्याने त्याने आत्महत्या केल्याची परिसरात चर्चा आहे. गणेश याच्या मागे आई, भाऊ, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. अचानक गणेश याने आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. याबाबत पंचवटी पोलीस आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.





