भुजबळ नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती – जरांगे पाटील
येवल्याला लागलेला डाग धुवून काढणार जरांगेकडून भुजबळांवर टीका !नाशिकच्या मराठा बांधवांचे तोंडभरून कौतुक !
नाशिक : भुजबळ नाशिक जिल्ह्याला लागलेली साडेसाती आहे. येवल्याचे नाव यंदा पवित्र होणार आणि येवल्याला लागलेला डाग धुवून काढणार असून, मराठ्यांच्या आड येणाऱ्यांचा कार्यक्रम करणार असल्याचे शांतता रॅलीच्या समारोप प्रसंगी घेण्यात आलेल्या सभेत बोलतांना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच, निवडणुका लढवायच्या ठरल्यास मराठ्यांनी समाजासाठी आणि आपल्या मुलांसाठी भरघोस मतदान करण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले.
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर जरांगे पाटील यांची शांतता रॅली सुरु असून, मंगळवार दि. १३ रोजी नाशिकमध्ये या रॅलीचा समारोप करण्यात आला. दुपारी दोन वाजेच्या सुमारास पंचवटी परिसरातील तपोवन येथून या शांतता रॅलीला सुरुवात करण्यात आली. छत्रपती संभाजी नगर नाका, आडगाव नाका, काट्या मारुती चौक, सेवाकुंज, निमाणी, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅन्ड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, मेहेर चौक मार्गे सीबीएस येथे या रॅलीची सांगता करण्यात आली. यावेळी याठिकाणी एका सभेचे आयोजन करण्यात आले होते.
या सभेला संबोधित करताना जरांगे पाटील यांनी सांगितले की, नाशिक जिल्ह्यातील मराठा ताकदीने एकत्र झाला. नाशिकच्या मराठ्यांनी सर्व महाराष्ट्राला दिशा दिली. मराठवाड्यापेक्षा अधिक ताकदीने मराठा समाज एकत्र आला असल्याचे सांगत त्यांनी नाशिकच्या मराठा बांधवांचे तोंडभरून कौतुक केले. तसेच, भुजबळ हे तुमच्या जिल्ह्याला लागलेली साडेसाती आहे. सर्व दुनियाचा दलिंदर म्हणतो आठ जागा निवडून आणून दाखव. आम्ही सांगतो याची सुरुवात नाशिक पासूनच करणार आहे. भुजबळाने पहिले शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी फोडली आता नंबर देवेंद्र फडणवीस यांच्या भाजपाचा आहे. समाजाच्या वेदनेपुढे माझ्या वेदना काहीच नाही. करोडो समाज बांधवाच्या वेदना बसू देत नाही. माझं दुखणं म्हणजे मराठा आरक्षण आहे. या वेदना कोणत्याही डॉक्टरांना समजणार नसल्याचे भावनिक उदगार देखील त्यांनी काढले.
शेवटी त्यांनी निवडणुकीच्या दृष्टिकोनातून बुधवार दि. १४ पासून ते मंगळवार दि. २० ऑगस्ट पर्यंत सर्वांनी आपला बायोडाटा घेऊन आंतरवली सराटी येथे येण्याचे आवाहन केले. तसेच, पक्षाला बाप मानण्यापेक्षा समाजाला बाप माना. वेळ आल्यावर बदला घ्यायचे शिका. उमेदवार उभा केला तर मराठ्यांची इज्जत जाऊ देऊ नका. भरभरून मतदान करा. मुलासाठी आणि जातीसाठी मतदान करून उभा केलेला उमेदवार निवडून देण्याचे देखील त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.





