“मधु”बनातील देहाविक्रीचा अड्डा उध्वस्त !
परराज्यातील चार महिलांची सुटका ; कारवाईपासून पंचवटी पोलिसांना ठेवले दूर !लॉजिंग मालक, मॅनेजर विरोधात गुन्हा दाखल !
नाशिक : प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पंचवटी परिसरात देहविक्रीचे रॅकेट सुरु असल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे पुणे येथील एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत तक्रार केल्यानंतर पंचवटी पोलिसांना कारवाई पासून दूर ठेवत हा अड्डा उध्वस्त करण्यात आला आहे. या कारवाईमध्ये पश्चिम बंगाल, गुजरात आणि झारखंड येथील चार महिलांची सुटका करण्यात आली आहे. तर, लॉज मालक आणि मॅनेजर विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्याअन्वये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पंचवटी परिसरात अवैध धंदे जोरात सुरू असल्याचे उघड झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे येथील प्रोग्राम असोसिएटस, फ्रिडम फर्म या संस्थेचे पदाधिकारी यांना नाशिकमध्ये पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांकडून बळजबरीने देहविक्री करून घेत असल्याची माहिती मिळाली होती. याबाबत त्यांनी शुक्रवार दि. ११ रोजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क करून कारवाई करण्याची विनंती केली होती. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशानुसार एक पथक तयार करून पंचवटी परिसरातील मुंबई आग्रा महामार्गावरील हॉटेल न्यू करवलीच्या पाठीमागे असलेल्या मधुबन लॉज येथे पथक पोहचले. यावेळी एक बनावट ग्राहक या लॉजमध्ये पाठविण्यात आले होते. या बनावट ग्राहकाने देहविक्री सुरु असल्याचा इशारा देताच पथकाने लॉजवर छापा टाकला. यावेळी याठिकाणी झारखंड, पश्चिम बंगाल आणि गुजरात येथून आणलेल्या चार महिलांना ताब्यात घेतले. तसेच, या महिलांसोबत अय्याशी करण्यासाठी आलेल्या वरवंडी, ता. दिंडोरी आणि कुरी, ता. चांदवड येथील दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
देहविक्रीबाबत पीडित महिलांना विचारले असता लॉज मालक संशयित प्रवीण खर्डे यांनी आपल्याला साफसफाईच्या कामासाठी आणल्याचे सांगितले. मात्र, आम्ही परराज्यातील असल्याचा गैरफायदा घेत साफसफाईचे काम न देता आमच्याकडून देहविक्री करून घेत असल्याचे सांगितले. तसेच, आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला जीवे मारण्याची आणि बदनामी करण्याची धमकी देऊन देहविक्री करून घेत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. यावेळी पोलिसांनी याठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कंडोम जप्त केले आहे. तसेच, संशयित लॉज मालक प्रवीण मधुकर खर्डे, रा. नाशिक आणि लॉज मॅनेजर मंटूकुमार सीताराम यादव, ३२, रा. मधुबन लॉजिंग, नाशिक, मूळ रा. काटाटोली, ता. जि. रांची, झारखंड यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“मधु”बन लॉजिंग येथे देहविक्रीचा अवैध धंदा हा पोलिसांच्या वरदहस्ताने चालू असल्याने पंचवटी पोलिसांना या कारवाईपासून दूर ठेवण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे. या देहविक्रीच्या अवैध धंद्यातून पोलिसांना मोठ्या प्रमाणात हप्ते चालू असल्याची चर्चा असून, येथील देहविक्रीचा धंदा अनेक वर्षांपासून सुरु आहे. असे असताना देखील पंचवटी पोलिसांकडून कुठलीच कारवाई केली जात नसल्याने त्यांचे यामागे आर्थिक हितसंबंध असल्याचे उघड झाले आहे अशी देखील चर्चा परिसरात सुरु आहे.ही कारवाई सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आंचल मुदगल, पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार, सुवर्णा महाजन, सुनील माळी, सहायक पोलीस उपनिरीक्षक शेरखान पठाण, पोलीस नाईक अजय गरुड, अंमलदार योगेश परदेशी, हर्षल बोरसे, पो. हवा. नीलिमा निकम, पो. अं. स्नेहल सोनवणे, पोलीस हवालदार दीपक पाटील यांनी केली आहे. संपूर्ण कारवाई पूर्ण झाल्यानंतर याठिकाणी पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. पोलिसांनी मधुबन लॉज येथून पॅसेंजर रजिष्टर, सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला आहे.





