गौंड वाडीत इमारतीचा स्लॅब कोसळून भाऊ बहीण जखमी !
पंचवटी : (वा.) पंचवटी परिसरातील गौंड वाडी येथील एका इमारतीचा स्लॅब कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत बहीण आणि भाऊ हे दोघे जखमी झाले असून, घरातील गृहपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेमुळे परिसरातील जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न पुढे आला आहे.
शहरात दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. सोमवार दि. २ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास पेठरोड परिसरातील गौंड वाडी येथील एका इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. स्लॅब कोसळताच घरातील रहिवाशांनी घराबाहेर पळ काढत आपला जीव वाचवला. मात्र, या दुर्घटनेमध्ये मानू शर्माकी आणि संध्या शर्माकी हे दोघे भाऊ बहीण जखमी झाले आहे. स्लब कोसळल्यामुळे घरातील गृहपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

इमारतीचा स्लॅब कोसळण्याची माहिती मिळताच माजी नगरसेवक हेमंत शेट्टी आणि शंकर हिरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नागरिकांना मदत करण्यास आणि धीर देण्यास सुरुवात केली. यावेळी येथील नागरिकांनी जीर्ण झालेल्या आणि असलेल्या समस्यांचा पाढा वाचत मदत करण्याचे आवाहन केले.
चौकट : हि इमारत मनपाच्या वतीने बांधून देण्यात आली आहे. मात्र, या इमारतीचे काम नित्कृष्ट दर्जाचे झाले असून, स्लॅबमध्ये लोखंडी गज आणि सिमेंटची थर अत्यंत कमी देण्यात आला असल्याची तक्रार येथील रहिवाशांनी केली. तसेच, याबाबत अनेकदा तक्रार करून देखील कोणीच त्याची दखल घेतली नसल्याचे देखील उपस्थित रहिवाशांनी सांगितले.





