पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने नाशिक हादरले ! - CHECKMATE NEWS
ठळक बातम्या

पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने नाशिक हादरले !


पंचवटी परिसरात दुसऱ्यांदा पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला !

रस्त्यावर धिंगाणा करणाऱ्यांना हटकल्याने केला प्राणघातक हल्ला !

शहरात नागरिकांसह पोलीस असुरक्षित !

नाशिक : पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस उपनिरीक्षकावर प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलीस उपनिरीक्षकावर थेट हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यावर खासगी रुग्नालयात उपचार सुरु असून पोलीस संशयितांचा शोध घेत आहे. पंचवटी परिसरात दुसऱ्यांदा पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडल्याने पोलिसांच्या अस्तित्वावरच नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

पंचवटी परिसरातील दिंडोरी नाक्यावर शुक्रवार दि. ४ ऑक्टोबर रोजी रात्री सव्वाआठ वाजेच्या सुमारास रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विकी संजय जाधव उर्फ गटया, रा. अवधूत वाडी, पंचवटी हा हातात चाकू घेऊन नागरिकांमध्ये दहशत निर्माण करीत होता. यावेळी मध्यवर्ती गुन्हे शाखेतील सहायक पोलीस उपनिरीक्षक नामदेव कारभारी सोनवणे, ५७, रा. धात्रक फाटा, पंचवटी हे याच रस्त्याने घरी जात होते. त्यांनी नागरिकांचा जीव वाचविण्याच्या हेतूने संशयितांकडून चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला असता, गटयाने थेट चाकू सोनवणे यांच्या पोटात खुपसल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस अधिकाऱ्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. या हल्ल्याने पोलीस प्रशासनाच्या इभ्रतीचे चांगलेच धिंडवडे निघाले आहे. ज्या शहरात पोलिसच असुरक्षित झाले असेल त्या शहरातील नागरिकांच्या सुरक्षेविषयी काही न बोललेलेच बरे म्हणायला हवे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पंचवटी पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस उपनिरीक्षक प्रकाश अभिमान नेमाने हे नेहमीप्रमाणे आपली ड्युटी करून सोमवार दि. ११ रोजी रात्री जवळपास दहा वाजेच्या सुमारास दिंडोरी रोडवरून घरी जात असताना वज्रेश्वरी झोपडपट्टी परिसरात दोन मद्यपी रस्त्यावर धिंगाणा करताना नेमाने यांना दिसले. यावेळी नेमाने यांनी त्यांना हटकताच या मद्यपींनी दगडाने नेमाने यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली. अचानक दगडाने हल्ला झाल्याने या हल्ल्यात नेमाने यांच्या तोंडावर गंभीर मार लागल्याने त्यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच, आपल्या गुन्हे शोध पथकाच्या टीमला संशयितांच्या मागावर पाठवून त्यांच्या मुसक्या आवळण्याचे आदेश दिले आहे. मात्र, पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर पोलीस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलिसांचा कुठलाही वचक शहरातील गुन्हेगारांवर राहिला नसल्याचे उघड झाले आहे.

एकीकडे शहरात वरिष्ठ पोलीस अधिकारी कोम्बिग ऑपरेशन आणि रूटमार्च करून गुन्हेगारांवर वचक निर्माण करीत असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. तर दुसरीकडे सोनसाखळी चोर रस्त्यावरून थेट घराच्या पार्किंगमध्ये येऊन महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे ओरबाडून घेऊन जात आहे. आणि त्यातच आता थेट पोलीस अधिकाऱ्यावरच प्राणघातक हल्ला झाल्याने नाशिक किती असुरक्षित आहे याचा प्रत्यय जाणवू लागला आहे. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक काही ठोस भूमिका घेणार की हातावर हात ठेवून गप्प बसणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे. 

 


Translate »
error: Content is protected !!