बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप निलंबित ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप निलंबित !


कागदपत्रांमध्ये फेरफार करून बाजार समितीसह शासनाची केली फसवणूक !

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव यांना सभापती कल्पना चुंभळे यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. सचिव यांनी संचालक मंडळ सभेच्या इतिवृतामध्ये नसलेले विषय जावक रजिस्टर मध्ये नोंदवून शासनाची आणि बाजार समितीची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती सभापती कल्पना चुंभळे यांनी दिली आहे. सचिवांची सध्या खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असून, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून हि फसवणूक केली आहे. याचा शोध घेऊन त्यानुसार दोषींविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली.

याबाबत अधिक माहिती अशी की, बाजार समितीचे सचिव प्रकाश घोलप यांनी सचिव म्हणुन कामकाज करीत असतांना अनेक गंभीर गैरकृत्य आणि गैरप्रकार केले असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. घोलप यांनी संचालक मंडळ सभेच्या इतिवृत्तामध्ये नाशिक बाजार समितीचे विभाजन करण्याबाबतचा सभेवर नसलेल्या विषयाचा ठराव स्वतंत्र कागदान्वये चिटकविला आहे. तसेच कार्यालयीन जा. क्र. ९० दि. २ मे २०२४ रोजी या जुन्या तारखेस जावक रजिस्टरला नोंदवला आहे. मात्र, सदर प्रस्ताव हा पणन संचालक यांना प्रत्यक्षात दि. १० मार्च २०२५ रोजी प्राप्त झाल्याचे त्यांच्याकडील पत्र जा.क्र. पणन- ५ / नाशिक कृउबास विभाजन / २०२५/ १०७६ दिनांक २५ मार्च २०२५ अन्वये आढळुन आले आहे. यामुळे महत्वाच्या व कायम दस्तऐवजीमध्ये फेरफार करुन गंभीर गैरकृत्य केल्याप्रकरणी बाजार समितीचा विश्वास गमावणारे अतिशय गंभीर गैरकृत्य केले असल्याचे प्रथमदर्शनी सिद्ध झाले आहे. तसेच, याशिवाय घोलप यांनी बाजार समितीच्या कामकाजाच्या कागदपत्रांमध्ये अजुनही अशा प्रकारचे गैरप्रकार केल्याची शक्यता संचालक मंडळाला आहे. त्यामुळे घोलप यांना स्वतंत्र आरोपपत्र देवून त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे बाजार समिती संचालक मंडळाने ठरवत त्यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे.

कृषि उत्पन्न खरेदी-विक्री नियमन (अधिनियम) १९६३ व त्याखालील नियम नं. १०० (६) चे तुरतुदीनुसार घोलप यांना त्वरीत निलंबीत करण्यात आले असून, त्यांच्याकडील सचिव पदाचा चार्ज, ताब्यातील सर्व कागदपत्रे, किल्ल्या वगैरे सर्व चिज वस्तु देखील जमा करून घेण्यात आल्या आहे. सध्या त्यांचा सचिव पदाचा पदभार सहायक सचिव निवृत्ती लहानु बागुल यांच्याकडे देण्यात आला आहे. प्रकाश घोलप यांना निलंबित केले असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक यांना पाठविण्यात आली आहे.

बाजार समितीचे निलंबित सचिव प्रकाश घोलप यांनी महत्वाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करून शासनासह बाजार समितीची मोठी फसवणूक केली आहे. त्यांनी हे गैरकृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले आहे. हे लवकरच खातेनिहाय चौकशीतून स्पष्ट होणार आहे. चौकशीचा अहवाल आल्यानंतर पुढील कायदेशीयर कारवाई करून फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. : कल्पना चुंभळे, सभापती, नाकृउबा समिती 

 

बाजार समितीमधील सुरक्षारक्षकांचा ठेका रद्द केल्यानंतर काही तासातच सचिव गोपाळ यांचे निलंबन करून देविदास पिंगळे यांना कल्पना चुंभळे यांनी मोठा दणका दिला आहे. तसेच, सचिव हा सभापतींच्या अधिपत्याखाली कामकाज करीत असल्याचे जगजाहीर असल्याने या फेरफार प्रकरणात पिंगळे यांचे नाव येणार असल्याची चर्चा बाजार समितीमध्ये रंगली आहे. या शासनाच्या फसवणूक प्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल झाल्यास माजी सभापतींसह अधिकारी आणि काही कर्मचाऱ्यांना जेलची हवा खावी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. 

 


Translate »
error: Content is protected !!