परराज्यातून आलेल्या भाविकांची सुरक्षा धोक्यात !
भाविकांमध्ये नाशिक पोलिसांबद्दल तीव्र नाराजी !
नाशिक : नाशिकमध्ये देवदर्शनासाठी येणार असेल तर भाविकांनो सावधान व्हा कारण पंचवटी परिसरात भाविकांची सुरक्षा चांगलीच धोक्यात आली आहे. गोदाघाट परिसरात आलेल्या भाविकांच्या साहित्यासह रोख रक्कम चोरीच्या घटना नित्याच्या झाल्या असल्या तरी याबाबत पोलिसांना कुठलेही देणेघेणे दिसत नाही. गेल्या आठवड्यात भाविकांचे साहित्य चोरीला गेले होते. या घटनेतील आरोपी मोकाट असतानाच पुन्हा एकदा भाविकांचे मोबाईल आणि रोख रक्कम चोरटयांनी लंपास केली आहे. या चोरीच्या घटनांमुळे पंचवटी परिसराचे नाव नाशिकसह इतर राज्यात देखील बदनाम होऊ लागले आहे.
नाशिकमध्ये मंगळवार दि. ६ रोजी देवदर्शनासाठी आलेले दिनेश रामसनई गुप्ता, ५२, रा. जि. जाजपूर, उडीसा हे संत गाडगे महाराज पुलाजवळील अमरधाम रोड येथील गोदावरी हॉटेल येथे मुक्कामी थांबले असता त्यांचे सात ते आठ मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला होता. या घटनेला एक आठवडा उलटत नाही तोच फिर्यादी रामगोपाल रामप्रसाद शर्मा, ६८, रा, विजयपुर, गोटारोड, जि. शिवपूर, मध्यप्रदेश हे बुधवार दि. १४ रोजी नाशिकमध्ये आपल्या सहकाऱ्यांसोबत देवदर्शनासाठी आले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास गाडगे महाराज पुलाजवळ गोदाघाट परिसरात बस मध्ये झोपलेले होते. यावेळी अज्ञात चोरटयांनी बसमधील प्रवाशांचे मोबाईल, रोख रक्कम आणि महत्वाची कागदपत्र असा एकूण ९६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक शहरातील नागरिक आपली दुचाकी घेऊन देव दर्शनासाठी गोदाघाट परिसरात आले की, त्यांची दुचाकी चोरीला जात आहे. याबाबत अनेक दुचाकी चोरीचे गुन्हे पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल होत आहे. मात्र, एकाही गुन्ह्याची उकल पंचवटी पोलिसांकडून होत नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. त्यात इतर राज्यातून आलेल्या भाविकांना या चोरट्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्वतःजवळचे साहित्य आणि रोख रक्कम चोरीला जात असल्याने त्यांना पुढचा प्रवास करणे अवघड होत आहे. मात्र, या चोरट्यांचा बंदोबस्त करणार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या परिसरात अनेक चोरटे सक्रिय झाले असून पंचवटी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी निष्क्रिय झाल्याचे दिसून येत आहे. यामुळे चोरट्यांचे मनोधैर्य चांगलेच वाढले असून त्यांनी थेट पोलीस कर्मचाऱ्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करण्याचे धाडस करून दाखवले आहे. तसेच, हजारो पोलीस कर्मचारी रस्त्यावर असतांना त्यांच्या उपस्थितीमध्ये अनेक नागरिक, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी आणि खिशातील मोबाईल लंपास केले आहे. या चोरीच्या घटनांमुळे पंचवटी पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जातीने लक्ष देण्याची गरज आहे.





