एस.टी. बस मध्ये महिलेची प्रसूती ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

एस.टी. बस मध्ये महिलेची प्रसूती !


प्रवाशी आणि शेतकरी महिलांच्या मदतीने नवजात शिशुचा जन्म !
नाशिक : नाशिकच्या सुरगाणा येथे सोनोग्राफीसाठी बसमधून प्रवास करणाऱ्या गर्भवती महिलेची बसमध्येच सुखरूप प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. प्रवासादरम्यान प्रसूती वेदना सुरू झाल्यामुळे बस थांबवत प्रवासी महिलांसह जवळील शेतातील महिला मजुरांच्या मदतीने बसमध्येच प्रसूती करावी लागण्याची घटना घडली आहे. या महिलेची प्रसुती सुखरूप होत तिला पुत्ररत्न प्राप्त झाले असून, माता आणि बालक दोघांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
         नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील अंबाडा गावातील अनिता मनोज चोथवा ही महिला सुरगाणा- नाशिक एसटी बस मधून १३ रोजी दुपारी वणी येथील रुग्णालयात सोनोग्राफीसाठी जात होती. प्रवास सुरू असताना अनिता हिला प्रसुती वेदना सुरू झाल्या. रुग्णवाहिका येण्यास वेळ लागणार असल्याने जामुनमाथा फाट्यावर बस थांबवण्यात येऊन प्रवाशांना खाली उतरवण्यात आले. यावेळी बसमधील महिला तसेच आजूबाजूच्या शेतात लावणी करत असलेल्या महिला मदतीसाठी धावल्या रुग्णवाहिका पोहोचेपर्यंत या महिलांच्या मदतीने अनिता हिची प्रसुती सुखरूप होऊन तिला पुत्ररत्न प्राप्त झाले. अनिता हिची प्रसूती सुखरूप होण्यासाठी येथे जवळच राहत असलेले सरपंच काशिनाथ गवळी यांच्या सह बस चालक अरुण लोकनार, वाहक रोहिदास यांचे सहकार्य लाभले. काली वेळात रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्यानंतर अनिता हिला रुग्णवाहिकेतून जवळील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
नाळे सकट रुग्णालयात : अनिता हिने बाळाला जन्म दिल्यानंतर नाळ कापण्यासाठी काहीच साहित्य उपलब्ध नसल्याने नाळ तशीच ठेवून नवजात शिशु आणि त्याची आई अनिता या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर येथील डॉक्टरांनी नाळ कापली.

Translate »
error: Content is protected !!