स्मार्टसिटी कंपनीचा काँक्रीट उद्योग जोरात सुरु - देवांग जानी - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

स्मार्टसिटी कंपनीचा काँक्रीट उद्योग जोरात सुरु – देवांग जानी


गोदापात्रातील काँक्रीट काढण्याऐवजी मोठ्या प्रमाणात भर !
नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गोदावरी नदीपात्रात टाकलेले सिमेंट काँक्रीट काढण्याऐवजी त्यात अजून मोठ्या प्रमाणात भर टाकली जात असल्याचा आरोप याचिकाकर्ते देवांग जानी यांनी केला आहे. याबाबत असलेली टेंडरची प्रत देखील त्यांनी पुरावा म्हणून सादर केली आहे. या प्रकारामुळे स्मार्टसिटी कंपनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला ठेंगा दाखवत असल्याचा आरोप देखील गोदाप्रेमींकडून करण्यात येत आहे. यावर जिल्हा प्रशासन काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
           स्मार्ट सिटीकडून गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जात आहेत. २००२-०३ च्या कुंभमेळा दरम्यान विकासकामे करतेवेळी मनपा प्रशासनाने गोदावरी नदी पात्रात सरसकट काँक्रीटीकरण करून सतरा कुंड बुजवल्यामुळे गोदावरी नदीचा श्वास कोंडला गेला होता. त्यामुळे एकप्रकारे ही गोदावरी नदी परावलंबी झाली असल्याचे गोदाप्रेमी यांचे म्हणणे आहे. हे काँक्रीटीकरण काढण्यासाठी देवांग जानी यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. यात न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार नाशिक महापालिकेने स्मार्ट सिटीच्या माध्यमातून गोदापात्रातील तळ काँक्रीट काढण्याच्या कामाला सुरुवात केली होती. 
              दुतोंड्या मारुती ते खंडोबा कुंड या दरम्यान असलेल्या कुंडातील काँक्रीट काढल्यानंतर स्मार्टसिटीने रामकुंड, गांधीतलाव, आणि रोकडोबा संतगाडगे महाराज पुलाखालील ते अमरधाम पर्यंत कुंडातील काँक्रीट काढण्याचे काम बंद केले. यानंतर याबाबत गोदाप्रेमींनी काँक्रीट काढण्याबाबत अनेकदा स्मार्टसिटी प्रशासनाला पत्र देत इशारा दिला. मात्र, स्मार्टसिटीच्या अधिकाऱ्यांनी याकडे सर्रास दुर्लक्ष करीत पुन्हा एकदा गोदावरी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात काँक्रीट टाकण्यास सुरुवात केली आहे. पूरस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी अहिल्यादेवी होळकर पुलाखाली स्वयंचलित बलून गेट बसविण्याचे काम गोदाप्रेमींच्या विरोधानंतर देखील चालू ठेवण्यात आले आहे. गोदापात्रात कुठलेही बांधकाम करण्यास परवानगी नसताना या बलून गेटचे काम सर्वांना डावलून युद्धपातळीवर सध्या सुरु आहे. यासाठी नदीपात्रात जवळपास २८० रेडी मिक्स काँक्रिटच्या गाड्या टाकण्यात आल्या असून यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचा आरोप गोदाप्रेमी देवांग जानी यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्मार्टसिटी कंपनीचा मनमानी कारभार चव्हाट्यावर आला आहे. यावर महसूल विभाग काय भूमिका घेते याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.  
रामकुंडातील काँक्रीट काढण्यासाठी स्मार्ट सिटीने त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. या समितीने निर्णय घेतला होता की, केंद्रीय संस्था निरी आणि भूगर्भ सर्वेक्षण विभाग (जीएसडीए) यांच्या सल्ल्याने रामकुंडातील कॉंक्रीट काढण्यात यावे. याबाबत गोदाप्रेमी देवांग जानी यांनी स्मार्ट सिटीला दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, स्मार्ट सिटी कंपनीच्या जानेवारी २०२० च्या इतिवृत्तात नमूद आहे कि, गोदावरी नदी पात्रातील सिमेंट काँक्रीट काढायला निरीची हरकत नाही. तसेच काँक्रीट काढल्याने नदीचा प्रवाह वाढेल. असा अहवाल निरीने स्मार्ट सिटीकडे सादर केला असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.
भूगर्भ सर्वेक्षण विभागाकडून सुचविण्यात आलेल्या रामकुंड जवळील स्पॉटवर नाशिक स्मार्ट सिटी मार्फत डिसेंबर २०२० मध्ये ट्रायल बोअर घेण्यात आला होता. त्यात दीड इंच पाणी लागले होते. ट्रायल बोअर मधून येणाऱ्या पाण्याची मोजदाद साठी ५ एच.पी. क्षमतेची जलपरी मोटर बसविण्यात आली होती. त्यातून एका मिनिटात ४१ लिटर पाणी बाहेर पडत असल्याचे नमूद करण्यात आले होते. या सर्व बाबी स्मार्ट सिटीच्या रेकॉर्डवर आहे. या दोन्ही संस्थांचा रामकुंडातील तळ काँक्रीट काढण्यासाठी हिरवा सिग्नल असताना, स्मार्ट सिटीकडून विनाकारण विलंब केला जात आहे. स्मार्ट सिटीने या सर्व बाबींचा विचार करता तात्काळ रामकुंडातील तळ काँक्रीट काढण्याच्या कामाला सुरुवात करण्याची मागणी गोदाप्रेमी देवांग जानी यांनी केली आहे.
सध्या नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे काँक्रिट उद्योग जोरात सुरु आहे. नाशिक स्मार्ट सिटी कंपनीने मेकॅनिकल गेटच्या बांधकामाच्या नावाखाली अहिल्यादेवी होळकर पुलाखालील नदी पात्रात १ हजार ६७५ cu meter concrete अर्थात २८० रेडी मिक्स काँक्रिटचा गाड्या ओतल्या आहे. त्यासाठी २ कोटी रुपये खर्च केला आहे. नाशिक स्मार्टसिटी कंपनी गांधी तलावातील तळ सिमेंट काँक्रिट काढण्यासाठीची सर्वच तांत्रिक व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा गांधी तलावाचे काँक्रिट काढत नाही. मात्र, अजून शेकडो टन काँक्रिट गोदा पात्रात ओतून नदीचे कधीही न भरून येणारे नुकसान करत आहे. हा उच्च न्यायालयाचा अवमान देखील आहे. : देवांग जानी, याचिकाकर्ते गोदाप्रेमी 

Translate »
error: Content is protected !!