नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी १९६ इच्छुक निवडणूक रिंगणात !
माघारीच्या अखेरच्या दिवशी १४१ इच्छुकांनी घेतली माघार !
नाशिक : महाराष्ट्राच्या विधानसभेचे बिगुल वाजले आहे. यंदा निवडणूक लढवून आमदार बनण्याची तयारी अनेक इच्छुकांनी केली होती. यामध्ये माघारीच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडीनंतर अनेक बलाढ्य उमेदवारांनी तर कुठे प्रादेशिक पक्षाच्या उमेदवारांनी पक्षादेशाचा दाखला देत आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहे. माघारीच्या अखेरच्या क्षणापर्यंत १४१ इच्छुकांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील १५ विधानसभा क्षेत्रामध्ये १९६ इच्छुक उमेदवार आपले नशीब आजमावणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
यंदाच्या विधानसभेची रणधुमाळी अनेक आरोप प्रत्यारोपांनी गाजणार आहे. त्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँगेसचे दोन वेगवेवेगळे पक्ष तयार झाल्याने यंदाच्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तसेच, महायुतीला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून मनसेच्या अनेक उमेदवारांनी या निवडणुकीतून माघार घेतल्याचे चित्र आहे. त्यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांची लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये छत्रपती संभाजी राजेंच्या स्वराज्य पक्षाने देखील अनेक ठिकाणी उमेदवार उभे केल्याने त्यांनाही या निवडणुकीमध्ये किती यश मिळणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
नाशिकमध्ये देखील राजकीय घडामोडी घडू लागल्या आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी ३३७ इच्छुक उमेदवारांनी विधानसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल केले होते. सोमवार दि. ४ रोजी माघारीच्या अंतिम दिवशी यातील १४१ उमेदवारांनी माघार घेतल्याने नाशिक जिल्ह्यातील १५ जागांसाठी १९६ उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाले आहे.
नाशिक जिल्ह्यात नांदगाव १४, मालेगाव मध्य १३, मालेगाव बाह्य १७, बागलाण १७, कळवण ७, चांदवड १४, येवला १३, सिन्नर १२, निफाड ९, दिंडोरी १३, नाशिक पूर्व १३, नाशिक मध्य १०, नाशिक पश्चिम १५, देवळाली १२, इगतपुरी १७ असे एकूण १९६ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहे.





