निवडणुकीच्या वादातून सिडको परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी ! - CHECKMATE NEWS
राजकीय

निवडणुकीच्या वादातून सिडको परिसरात दोन गटांमध्ये हाणामारी !


पूर्व विधानसभेच्या वादानंतर पश्चिम मतदार संघात तणाव !
नाशिक : पंचवटी परिसरात गुरुवारी पैसे वाटण्यावरून तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. हि घटना ताजी असतानाच शुक्रवारी सिडको परिसरातील सावता नगर येथे मतदानाच्या स्लिप वाटप करण्याच्या कारणाहून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दोन्ही गटांनी अंबड पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दाखल केल्या आहे. अचानक भर चौकात झालेल्या हाणामारीच्या घटनांमुळे सिडको परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. यावेळी परिसरात पोलिसांनी धाव घेत परस्थिती आटोक्यात आणली आहे. 
           याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार दि. १५ रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास सावता नगर येथे शिवसेना उबाठा गटाच्या वतीने स्लिप वाटप करण्यात येत होत्या. यावेळी सावता नगर येथे उबाठा गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते पैसे वाटप करत असल्याचा संशय आल्याने भाजप उमेदवार सिमा हिरे यांच्या कार्यकर्ते सावता नगर येथे पोहचले. यावेळी येथे दोन गटात शाब्दिक वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. या मारहाणीत भाजपाचे कार्यकर्ते प्रदीप चव्हाण यांच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याने ते जखमी झाले. तसेच या मारहाणीत शिवसेना ठाकरे गटाचा एक कार्यकता देखील जखमी झाला असल्याचे यावेळी पोलिसांनी सांगितले.
          या घटनेची माहिती मिळताच भाजप आणि उबाठा गटाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी तात्काळ अंबड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यास सुरुवात केली. याबाबत अंबड पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले असून अधिक तपास अंबड पोलीस करीत आहेत. या मारहाणीच्या घटनेचे सिसिटीव्ही फुटेज पोलिसांना मिळालेले असून येथे झालेल्या वादात गोळीबार झाला नसल्याची स्पष्टोक्ती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली असून याबाबत संपूर्ण तपास करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
स्वामी विवेकानंद नगर येथे भाजपाच्या वरिष्ठ नेत्या पंकजा मुंढे यांची सभा सुरु असतांनाच हा हाणामारीचा प्रकार घडला. यावेळी सभा संपताच पंकजा मुंडे यांनी थेट अंबड पोलीस ठाणे गाठून त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी सावता नगर येथे झालेल्या वादात भाजपच्या कार्यकर्त्यावर धारदार शत्राने हल्ला हल्ला करण्यात आला असल्याचा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात आला आहे. तर येथे गोळीबार झाला असल्याचा दावा देखिल करण्यात आला आहे. हाणामारीचा प्रकार घडल्यानंतर अंबड पोलीस स्टेशनला मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.काही वेळातच पोलीस ठाण्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बल तैनात करण्यात आल्याने पोलीस ठाण्याला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.
ही घटना गंभीर आणि निंदनीय आहे. अशा प्रकारची गुंडगिरी चालणार नाही. प्राणघातक हल्ला झाला असल्याने मी यावर पोलिसांना लक्ष घालण्यास सांगितले आहे. निवडणूक सुरू असताना अशा घटना घडत आहेत. याबाबत मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी यासंदर्भात चर्चा करणार आहे. आमची निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर सुरू आहे. आमचे संस्कार हे जातीवर निवडणूक लढवणे नाही. : पंकजा मुंडे, भाजप नेत्या
 
आमचे बूथ प्रमुख सावतानगर परिसरात लोकशाही पद्धतीने मतदारांना स्लीपा वाटप करत होते. यावेळी भाजपाच्या काही कार्यकर्त्यांनी सावता नगर येथे कार्यकर्त्यांना जबरदस्तीने मारहाण करून त्यांच्यावर धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आमचे कार्यकर्ते पैसे वाटप करताय असे भाजपाच्या लोकांना वाटत होते तर त्यांनी पोलिसांना सांगणे गरजेचे होते. महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून जाणीवपूर्वक वातावरण खराब केले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासून योग्य ती कारवाई करावी. : सुधाकर बडगुजर, उमेदवार, महाविकास आघाडी
 
विरोधकांना महिला उमेदवाराची भीती वाटत असल्याने ते आता असे प्रकार करायला लागले आहे. सिडकोतील सावता नगर येथे पैसे वाटत असल्याचे आमच्या कार्यकर्त्यांना समजले असता ते तिथे गेले. यावेळी विरोधकांनी २० ते २५ गाड्या मधून गुंड आले. त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. या मारहाणीमध्ये कार्यकर्ता प्रदीप चव्हाण हा जखमी झाला आहे. आपण निवडून येणार नाही याची त्यांना भीती वाटत असल्याने ते असे प्रकार करत आहेत पोलिसांनी संबंधित गुंडांवर कठोर कारवाई करावी. : आ. सीमा हिरे 
 
सदर प्रकार हा मतदानाच्या स्लिपा वाटप करण्यातुन झाला आहे. सिसिटीव्ही तपासले असता कुठेही गोळीबार झाला असल्याचे दिसून येत नाही. याबाबत सखोल तपास सुरु आहे. एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध सुरु आहे. नेमकं काय घडले, कसे घडले याबाबत अधिक तपास सुरु आहे. : मोनिका राऊत, पोलीस उपायुक्त

Translate »
error: Content is protected !!