शब्दाला जागणारे अभ्यासू व्यक्तिमत्व… कणभर अहंकार नसलेले पाणीदार नेतृत्व – अरुण पवार
शहरासह २३ खेड्यांमधील सुमारे अडीच ते तीन लाख लोकांना पाणीपुरवठा होणार !
महिलांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी लागणार मार्गी !
नाशिक : झपाट्याने विस्तारीत होणाऱ्या नाशिक शहरातील पाणीप्रश्न नाशिक पूर्व मतदार संघाचे आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी मार्गी लावला आहे. अधिवेशनात राहुल ढिकले यांनी या संदर्भातील तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी ढिकले यांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २०११ मधील जन-गणनेनुसार नाशिक शहराची लोकसंख्या साधारण १४ लाखांच्या घरात होती. मात्र, गेल्या दहा वर्षांत लोकसंख्येने २० लाखांचा टप्पा पार केला आहे. सध्या गंगापूर धरण समूहातून दररोज ४०० दशलक्ष लिटर आणि मुकणे धरणातून १२५ असे एकूण सुमारे ५२५ दशलक्ष लिटर पाण्याचे वितरण केले जाते. अशा परिस्थितीमध्ये आ. ढिकले यांनी २२६ कोटींची अमृत- २ हि योजना आणल्याने शहराच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याची माहिती प्रचारादरम्यान माजी नगरसेवक अरुण पवार यांनी मतदारांना दिली आहे.
म्हसरूळ शिवारात ढिकले यांच्या प्रचारादरम्यान अरुण पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गंगापूर, मुकणे आणि दारणा धरणातील पाणी शहरातील विविध भागांत पोहोचवण्यासाठी सात जलशुद्धीकरण केंद्र आहेत. सातपूरमधील शिवाजीनगर, पंचवटी, दिंडोरीरोड, निलगिरी बाग, गांधीनगर, नाशिकरोड, बारा बंगला आणि विल्होळी अशा सात ठिकाणच्या केंद्रांची एकूण ६१० दशलक्ष लिटर इतके पाणी शुद्धीकरणाची क्षमता आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणाच्या नवीन नियमानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी १३५ लिटर प्रत्येक दिवशी पाणी देणे बंधनकारक आहे. त्यासाठी पाणी गळतीही कमी करणे अपेक्षित आहे. महापालिका क्षेत्रातील अनेक जलवाहिन्या जुन्या व जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे पाणी गळतीचे प्रमाण मोठे आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना यावर कुठलेही काम केले गेले नव्हते. याच सरकारच्या काळात आमदार राहुल ढिकले यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विचारणा केली होती. आमदार ढिकले यांची पाण्यासाठीची तळमळ बघता त्यावेळचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना आश्वस्त केले की, नाशिक शहरातील तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या आणि जीर्ण जलवाहिन्या बदलण्यात येतील. नवीन वसाहतीतील जलवाहिन्यांसाठी २२६ कोटी ३४ लाख रुपयांचा पाणीपुरवठा योजनांचा सुधारित आराखडा केंद्र शासनाच्या अमृत-२ या योजनेसाठी राज्य वार्षिक कृती आराखड्यात घेतला जाईल. हा प्रकल्प मंजूर झाल्यास २० लाख लोकसंख्येच्या शहरात ३०० किलोमीटरचे नवीन जलवाहिन्यांचे जाळे अस्तित्वात येणार आहे.
या योजनेसाठी केंद्र शासनाच्या अमृत-२ योजनेतून निधी मिळाल्यावर पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शहरात आजमितीस जवळपास ११० जलकुंभातून २२०० किमी पाइपलाइनद्वारे दोन लाख ३०० घरांना पाणी दिले जाते. शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता ८५ किमीच्या रॉ वॉटर पाइपलाइन जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत जोडलेल्या आहेत. शुद्धीकरण केलेले पाणी जलकुंभात भरण्यासाठी १०५ किलोमीटरच्या मुख्य पाइपलाइन आहेत. पाणीपुरवठा व्यवस्था सक्षम करण्यासाठी सध्या असलेल्या ११० जलकुंभांमध्ये नव्याने २५ जलकुंभांची वाढ होणार असून ३०० किमीच्या जलवाहिन्या वाढणार आहे.
पाण्याचे मोजमाप करण्यासाठी मिटरिंग करून पाणी गळती थांबवली जाणार आहे. त्यासाठी धरणापासून ते जलशुद्धीकरण केंद्र आणि तेथून पुढे ग्राहकांपर्यंत पाणी वितरणासाठी अद्ययावत अशी स्काडा यंत्रणा कार्यान्वित करून ग्राहकस्तरावर वॉटर मीटर अद्ययावत झाल्यास योग्य दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्र ते सातपूर अशी सिमेंटची पाइपलाइन जुनी झाल्याने तिची वहन क्षमता कमी झाल्याने येत्या काळात लोखंडी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. आमदार राहुल ढिकले यांनी केलेल्या प्रयत्नामुळे संपूर्ण शहराचा पाणीप्रश्न आता सुटणार आहे. म्हणूनच म्हटले जाते, आमदार राहुल ढिकले म्हणजे जनतेसाठी लढणारे आणि शब्दाला जागणारे अभ्यासू व्यक्तिमत्व… कणभर अहंकार नसलेले पाणीदार नेतृत्व !
जुन्या जलवाहिन्या बदलून नवीन टाकण्यासाठी शासनाच्या अमृत २ योजनेतून महापालिकेने ३४२ कोटी रुपयांची कामे हाती घेण्यास सुरुवात झाली आहे. विधानसभा निवडणूक आचारसंहितेत हे काम अडकू नये म्हणून फास्टट्रॅक वर या कामाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. यामुळे शहरातील २५ लाख नागरिकांना तसेच आजूबाजूच्या २३ खेड्यांमधील सुमारे अडीच ते तीन लाख लोकांना या योजनेमुळे पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील एकही आमदाराने दाखवले नाही इतके मोठे काम आमदार राहुल ढिकले यांनी करून दाखवले असल्याचे यावेळी अनेक नागरिकांनी सांगितले.





