हायप्रोफाईल सेक्स रॅकेटमध्ये राजकीय नेत्याचा सहभाग उघड !
नाशिकच्या राजकीय क्षेत्रात एकच खळबळ !
नाशिक : आडगाव परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये चालणाऱ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने केला आहे. यामध्ये एका महिलेला आणि तिच्या साथीदाराला अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटप्रकरणी पोलिसांनी एका राजकीय नेत्याला अटक केली आहे. कुंटणखान्यामध्ये थेट राजकीय नेत्यांची भागीदारी समोर आल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या कुंटखान्यात अजून काही राजकीय व्यक्तींचा समावेश आहे का याचा पोलीस शोध घेत आहे. त्यामुळे या हायप्रोफाईल सेक्स रॅकेटकडे नाशिकसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
बुधवार दि. ४ रोजी पोहवा शेरखान पठाण व पोहवा गणेश वाघ यांना माहिती मिळाली होती की, आडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक महिला ही निर्माण नक्षत्र बिल्डींग, कपालेश्वर नगर, संभाजी नगर रोड येथे काही महिलांकडुन वेश्या व्यवसाय करून घेत आहे. याबाबत माहिती मिळताच पी.सी. बी.एम.ओ.बी-मध्यवर्ती गुन्हेशाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या पथकाने सापळा रचून या महिलेच्या घरी बनावट ग्राहक पाठवला. यावेळी वेश्या व्यवसाय सुरु असल्याची पुष्टि होताच छापा मारून कारवाई केली होती. यामध्ये अनैतिक देहव्यापार चालवणारी संशयित कविता किशोर साबळे, ४०, रा. निर्माण नक्षत्र सोसायटी, कपालेश्वर नगर, संभाजी नगररोड या महिलेला आणि जाफर अशरफ मन्सुरी, २५, रा. समता नगर, आगार टाकळी, नाशिक, मूळ रा. समस्तीपूर मोतीहरी जि. बिहार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. तसेच, देह व्यापारासाठी आणलेल्या दोन पीडित मुलींची सुटका देखील पोलिसांनी केली होती. या संशयितांविरोधात आडगाव पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा कलम ३,४,५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान या गुन्ह्याचा तपास करीत असताना संशयित महिला कविता साबळे हिच्या फ्लॅटमध्ये पवन क्षीरसागर हा देखील येऊन कुंटणखाना चालविण्यास मदत करीत असल्याचे काही साक्षीदारांनी पोलिसांना माहिती दिली होती. त्याअनुषंगाने तपास केला असता पवन बाळकृष्ण क्षीरसागर, ५४, रा. जेतवन नगर, शरणपूर, नाशिक याचा सहभाग असल्याचे उघड झाले. यावरून पोलिसांनी आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र संघटक पवन क्षीरसागर याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सोमवार दि. ९ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. कुंटणखान्यात थेट राजकीय नेत्याचा सहभाग उघड झाल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या कुंटणखान्यात अजूनही कोणत्या राजकीय नेत्याचा सहभाग आहे का याचा पोलीस तपास करीत आहे.