वर्चस्व वादातून पंचवटी परिसरात गोळीबार ! - CHECKMATE NEWS
क्राईम

वर्चस्व वादातून पंचवटी परिसरात गोळीबार !


गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये टोळीयुद्ध भडकले !
२०२३ मध्ये देखील केला होता गोळीबार !

नाशिक : पेठरोड परिसरातील सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्यांमध्ये मध्यरात्री टोळीयुद्धातून थेट गोळीबार झाल्याची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात पोलिसांनी फिर्यादी होत दोन्ही टोळीतील गुन्हेगारांवर गुन्हे दाखल केले आहे. विशेष म्हणजे याच टोळीतील गुन्हेगारांनी काही दिवसांपूर्वी देखील गोळीबार करीत आपली दहशत पसरवली होती. जामीनावर बाहेर येताच पुन्हा गोळीबार केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. या घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 

             नाशिकमध्ये गोळीबाराच्या घटना सातत्याने घडू लागल्या आहे. उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये वर्चस्व वादातून दोन टोळ्यांमध्ये गेल्या आठवड्यात गोळीबाराची घटना घडली होती. हि घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा पंचवटी परिसरात टोळीयुद्धातून गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात पुन्हा एकदा खुनाचे सत्र सुरु होणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. यावर पोलिसांनी वेळीच कडक पाऊले उचलत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या नाहीतर नाशिक पुन्हा रक्तरंजीत झाल्याशिवाय राहणार नसल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 
             बुधवार दि. २३ रोजी मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास संशयित आरोपी विकास उर्फ विकी विनोद वाघ, २६, रा. मरीमाता मंदिराच्या पाठीमागे, पाट किनारी, पेठरोड, ऋषिकेश गणेश परसे उर्फ बाबा, २२, रा. कुमावत नगर, जॉगिंग ट्रॅकजवळ, पंचवटी, जय संतोष खरात, २०, रा. शेषराव महाराज चौक, फुलेनगर, पेठरोड, जय मोरे उर्फ टिंगरी, तुंड्या दादू पूर्ण नाव माहित नाही आणि त्यांचे इतर चार ते पाच साथीदार यांनी फिर्यादी सुमित दयानंद महाले, २१, रा. मुंजोबा चौक, फुलेनगर, पेठरोड मूळ रा. गिरणारे, नाशिक यांच्या चाळीखाली येऊन त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच, या संशयितांनी महाले याच्या घरावर दगडफेक करून त्यांना जीवे मरण्याच्या उद्देशाने गावठी कट्ट्यातून गोळीबार करीत आपली दहशत माजवत निघून गेले. दैव बलवत्तर म्हणून यात गोळी कोणालाही लागली नसल्याने जीवितहानी टळली आहे. 
               तर याच प्रकरणी दोन्ही टोळीतील सदस्यांनी एकमेकांवर बियरच्या बाटल्या फेकत परिसरात दहशत निर्माण केली म्हणून संशयित रोहित खंडू गांगुर्डे, रा. विजय चौक, फुलेनगर, पेठरोड, पंचवटी याच्यासह त्याच्या टोळीतील प्रेम दयानंद महाले, सुमित दयानंद महाले, रा. मुंजोबा गल्ली, फुलेनगर, प्रेम संतोष मिरके तसेच, विरोधी टोळीतील संशयित विशाल उर्फ शैलेश चंद्रकांत भालेराव, २०, रा. मधुबन कॉलनी, पंचवटी याच्यासह त्याच्या टोळीतील विकी विनोद वाघ, मरीमाता मंदिराच्या पाठीमागे, पेठरोड, ऋषिकेश गणेश परसे उर्फ बाबा, कुमावत नगर जॉगिंग ट्रॅक जवळ, पंचवटी, जय संतोष खरात, शेषराव महाराज चौक, पेठरोड, जय मोरे उर्फ टिंगरी, तुंड्या जाधव आणि त्याचे इतर आठ ते दहा साथीदारांविरोधात पोलीस कर्मचारी राजू गुंजाळ यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या दोन्ही टोळीतील सदस्य फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहे. 
११ मार्च २०२३ रोजी विशाल संजय महाले या युवकाच्या मुंजोबा चौक येथील घरावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यामध्ये देखील गोळीबार करण्यात आला होता. मात्र, गोळीबाराच्या घटनेतून विशाल हा वाचला होता तर जाब विचारण्यास गेलेल्या विशालच्या आई उषा संजय महाले यांना गोळी लागल्याने ती गंभीर जखमी झाली होती. हा हल्ला देखील संशयित आरोपी विशाल चंद्रकांत भालेराव, संदीप अहिरे, जय खरात, विकी वाघ यांनी केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

Translate »
error: Content is protected !!