बदलीच्या सौदेबाजी प्रकरणानंतर उचलबांगडी झालेल्या सुभेदाराची जागा मिळवण्यासाठी खलबत्तं !
सुभेदार पद मर्जीतल्या व्यक्तीला मिळवून देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांकडून फिल्डिंग !नाशिकरोड व पंचवटी पोलीस ठाण्यातील काही पोलीस कर्मचाऱ्यांचा यासाठी पुढाकार !
नाशिक : मर्जीच्या व मोक्याच्या ठिकाणी बदली करून देण्याच्या बदल्यात ३५ लाखांच्या सौदेबाजी प्रकरणाने नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात प्रचंड खळबळ उडाली होती. या प्रकरणामुळे शहरात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस आयुक्तांची प्रतिमा मलिन करण्याचे धाडस करणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे अशी मागणी होत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणात नाशिकरोड पोलीस ठाण्यातील सुभेदाराची उचलबांगडी करण्यात आली आहे. या सुभेदाराच्या जागी आपली वर्णी लागावी यासाठी अनेकांनी आपल्या पद्धतीने फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. तर उचलबांगडी झालेला सुभेदार आपण दहा दिवसांच्या आत पुन्हा नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल होणार असल्याचे सांगत एकप्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आव्हान देत सालीचे दिसत आहे.
राजकीय नेत्यांशी व पोलीस अधिकाऱ्यांशी ओळख असल्याचे भासवत पाहिजे त्या ठिकाणी बदली करून देतो परंतु त्यासाठी आर्थिक पूर्तता करावी लागेल. पोलीस कर्मचारी सागर पांगरे व पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांची इंदिरानगर पोलीस स्टेशनला बदली करून देतो म्हणणारा पांगरेचा मित्र मालेगाव शहर पोलीस ठाण्याचा कर्मचारी नितीन सपकाळे याच्या विरोधात मुंबई नाका पोलीस ठाणे येथे नाशिकरोड येथून दंगा नियंत्रण कक्षात उचलबांगडी झालेला आणि यापूर्वीही अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गैरव्यवहार प्रकरणी विधानभवनात तारांकित प्रश्नाने चर्चेत आलेला वादग्रस्त पोलीस कर्मचारी प्रशांत नागरे याच्या तक्रारीवरून खंडणी व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बड्या अधिकाऱ्यांना व पोलीस खात्याला बदनाम करणाऱ्यांची गंभीर दखल घेत आयुक्तांनी “त्या” पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्याचे संकेत दिले तर पांगरे व सपकाळे यांच्याशी संबंधित प्रशांत नागरे, पवन परदेशी, जनार्दन ढाकणे, अशोक आव्हाड व समाधान चव्हाण या पाच कर्मचाऱ्यांची दंगा नियंत्रण कक्षात पाठवण्यात आले.
तरीही उलटे काम करणाऱ्या ह्या कर्मचाऱ्यांचे धाडस काही केल्या थांबत नाही हे विशेष….. या प्रकरणानंतरही इतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बोध घ्यायचं सोडून मर्जीतल्या व्यक्तीला पाहिजे त्या ठिकाणी व हवी ती महत्त्वाची (आर्थिक) सुभेदारकीची जबाबदारी मिळावी यासाठी लॉबिंग करण्यास सुरुवात झाली असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यातील सुभेदार याची दंगा नियंत्रण कक्षात गच्छंती करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्या बदलीनंतर ती जबाबदारी आपल्या मर्जीतल्या व्यक्तीला मिळावी यासाठी स्थानिक नाशिकरोड पोलीस ठाण्यातून बदली झालेले परंतु अद्याप पदभार न सोडलेले उपनिरीक्षक व त्यांचा “अ- विनाशी” रायटर आपली “पॉवर” वापरत आहे. तर पंचवटीतील स्वतःला बाहुबली समजणारा सुस्थितीत चालणाऱ्या घरांना “शे- ठिकाणी- ताळे-” लावणारा पोलीस कर्मचारी देखील आपली पूर्ण ताकद पणाला लावून आपलाच माणूस नाशिकरोडला बसणार असा दृढ विश्वास व निश्चय व्यक्त करत असल्याच्या चर्चेमुळे शिस्तीचं खातं म्हणवणाऱ्या पोलीस खात्यात वरिष्ठांना काही किंमत शिल्लक राहिली की नाही, की लॉबिंग करणारे स्थानिकच सर्वेसर्वा आहे हा खात्यावर संशय निर्माण करणारा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पोलीस खात्यातील मूळ जबाबदारी बाजूला सारत नको त्या गोष्टीत अधिक रुची दाखवणाऱ्यांना दणका देत इतरांना खबरदार करण्याची वेळ आता पोलीस आयुक्तांवर आली आहे. कारण दंगा नियंत्रण कक्षात बदली होऊनही हा सुभेदार अति महत्वकांशी होत नाशिकरोडच्या निरीक्षकांना अशी बतावणी करत आहे की आपण दिलेली महत्त्वाची जबाबदारी यापुढेही मीच सांभाळेल. कारण दहा दिवसाच्या आत मी पुन्हा नाशिकरोडला येणार अशी चर्चा नाशिकरोडच्या पोलीस वर्तुळात तसेच अवैध धंदे चालकांमध्ये आहे. सुभेदाराच्या या दृढ विश्वासाला दुजोरा मिळण्याचे कारण म्हणजे शनिवार दि. २ ऑगस्ट रोजी रात्री नऊ ते दहा वाजे दरम्यान शासकीय वाहनात बसून घरी जाण्यास निघालेले पोलीस निरीक्षक हे स्वतः सुभेदाराला पाहून गाडीतून खाली उतरले व पोलीस ठाण्याच्या आवारातच कोपऱ्यात काहीतरी चर्चा करण्यात मग्न झाले असल्याचे अनेकांनी बघितले. त्यामुळे या दोघांमध्ये रंगलेली नेमकी ती चर्चा काय याचा शोध वरिष्ठांनी घ्यावा अशी देखील चर्चा नाशिकरोड पोलीस ठाण्यात सुरु आहे……
उचलबांगडी झाल्यानंतर देखील सुभेदार हा पोलीस ठाण्यात उघडपणे फिरतो आणि मी पुन्हा येईन असे सांगत फिरत आहे. त्यामुळे हा प्रकार म्हणजे आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्याच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अशा मुजोर कर्मचाऱ्यांवर कायमस्वरूपी कडक कारवाई करावी अशी देखील मागणी पोलीस वर्तुळातून केली जात आहे. जाहीर आहे की, मागणी उघड पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी करून दाखविणार नाही. मात्र, चर्चा सुरु झाल्या आहे याचा मागोवा तरी पोलीस आयुक्तांनी घ्यावा अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून पोलीस आयुक्तालय आपल्या मर्जीनुसार चालवण्यात सुभेदार अग्रेसर झाले होते. तसेच, कोणत्या पोलीस ठाण्यात कोणत्या अधिकाऱ्याची बदली करायची आणि कोणाला नियंत्रण कक्ष द्यायचे हे देखील हे सुभेदार ठरवत होते. यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये मोठी खदखद निर्माण झाली होती. हा अतिरेक तत्कालीन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी हेरला आणि पोलीस प्रशासनातील विविध पोलीस ठाण्यातील २५ सुभेदारांना थेट महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये पाठवले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात सुभेदाराची मनमानी मोडीत निघाली होती. मात्र, सिंगल यांची बदली होताच पुन्हा या सुभेदारांनी आपले वजन वापरत पुन्हा बदली करून घेत, मलईदार पोलीस ठाणे मिळविण्यात यश मिळविले होते. सध्या पुन्हा या सुभेदारांनी पोलीस प्रशासनाला आपल्या बोटांवर खेळविण्यास सुरुवात केल्याचे दुर्दैवी चित्र दिसू लागले आहे.





