बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे तीन चिमुरड्यांना जलसमाधी ! - CHECKMATE NEWS
जिल्हा

बिल्डरच्या निष्काळजीपणामुळे तीन चिमुरड्यांना जलसमाधी !


साईटवरील खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू !
बांधकाम व्यावसायिकासह ठेकेदार पोलिसांच्या ताब्यात !
निष्काळजीपणा केल्याचा आरोप करीत स्थानिकांचा रास्तारोको !
नाशिक : पंचवटी परिसरातील अमृतधाम, बिडी कामगार नगर येथून तीन चिमुरडे बेपत्ता झाले होते. मात्र, सोमवारी सकाळी या तिघांचे मृतदेह याच परिसरात असणाऱ्या द व्ही पार्क या बांधकामाच्या साईटवर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. संतप्त नागरिकांनी निष्काळजीपणा करणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, पोलिसांनी देखील गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप केला आहे. मुलांचे मृतदेह पाहताच त्यांच्या पालकांनी एकच आक्रोश केल्याने सर्वांना कंठ दाटून आला होता. 
             रविवार दि. २९ रोजी सकाळी अकरा वाजेपासून अमृतधाम बिडी कामगार नगर येथून साई गोरख गरड, १४, साई हिलाल जाधव, १४ आणि साई केदारनाथ उगले, १३ हे तिघे चिमुरडे बेपत्ता झाले होते. त्यांचा परिसरात शोध घेतला असता ते कुठेही मिळून आले नसल्याने त्यांच्या पालकांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत मुले बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर शोधाशोध सुरु असताना सोमवार दि. ३० रोजी सकाळी परिसरात असणाऱ्या द व्ही पार्क बांधकाम साईटवर खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पाणी भरलेले होते. या खड्ड्याच्या बाहेर काही कपडे आढळून आले. त्यावरून त्याची ओळख केली असता हे कपडे बेपत्ता मुलांचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून याठिकाणी असलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात शोधकार्य सुरु करण्यात आले. यावेळी या खड्ड्यात बेपत्ता असलेले साई गरड, साई जाधव आणि साई उगले यांचे मृतदेह सापडले. मृतदेह बघताच त्यांच्या पालकांनी एकच आक्रोश केला. हा आक्रोश बघून उपस्थितांच्या डोळ्यात देखील अश्रू तरळले होते.
           यानंतर संतप्त नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकाला अटक करण्यासाठी रास्तारोको आंदोलन केल्यानंतर आडगाव पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विजय कांतीभाई शेखालीया, रा. सिडको, नाशिक आणि ठेकेदार आकाश शंकर गायकवाड, रा. पवार मळा, आरटीओ कार्यालयासमोर पेठरोड, नाशिक या दोघांना ताब्यात घेत त्यांच्याविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी दिली.
यावेळी माजी नगरसेविका पूनम सोनवणे यांनी आडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली असल्याचा आरोप केला. तसेच, बांधकाम व्यावसायिकाने याठिकाणी सुरक्षेची कुठलीही काळजी घेतली नसल्याचे सांगितले. या बांधकाम साईटवर गेट बसविले नसल्याचा आणि सुरक्षारक्षक नसल्याने ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगितले. बांधकाम व्यावसायिकावर याबाबत गुन्हा दाखल करावा यासाठी त्यांनी आणि संतप्त नातेवाईकांनी रस्त्यावर ठिय्या देत रास्तारोको आंदोलन केले. यामुळे परिसरात काहीकाळ वाहतूक विस्कळीत झाली होती.
हि तीन लहान मुले रविवार असल्याने खेळण्यासाठी बाहेर गेली होती. त्यानंतर ते गायब झाले होते. पोलिसांना काही नागरिकांनी हि मुले मंगल कार्यालयांमध्ये गेली असल्याची माहिती दिली असता पोलिसांनी परिसरातील सर्व मंगल कार्यालये आणि लॉन्स पिंजून काढली मात्र, हि मुले कुठेही आढळून आली नाही. त्यानंतर या मुलांचा शोध गोदाघाटासह त्रंबकेश्वर येथील पहिने परिसरात देखील शोध घेण्यात आला. त्यानंतर रात्री उशिरा ते बेपत्ता झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. 
मयत मुलांमधील साई जाधव याला त्याच्या पालकांनी मुलबाळ नसल्याने आपल्या नातेवाईकांकडून दत्तक घेतले होते. तर साई गरड हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता. तसेच, साई उगले याला एक बहीण आणि एक भाऊ असल्याची माहिती समोर आली आहे. 

Translate »
error: Content is protected !!