उड्डाणपुलावर चार वाहनांचा अपघात !
निर्भय महाराष्ट्र पार्टीकडून निषेध ; वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान !
नाशिक : पंचवटी परिसरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाला मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. हे खड्डे वाचविताना झालेल्या अपघातामध्ये चार वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे. या अपघातप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहे. दरम्यान उड्डाण पुलाला पडलेल्या खड्ड्यांच्या निषेधार्थ निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या वतीने आंदोलन करीत शासनाचा निषेध करण्यात आला.


करोडो रुपये खर्च करून आडगाव ते पाथर्डी फाटा दरम्यान उड्डाण पुलाची निर्मिती करण्यात आली आहे. यासाठी टोलच्या माध्यमातून वाहनधारकांकडून दररोज लाखो रुपयांची वसुली केली जात आहे. मात्र, या टोल आकारण्यात येणाऱ्या रस्त्याला आणि यावर बांधण्यात आलेल्या उड्डाण पुलाला ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे. या खड्डयांमधून आपले वाहन चालविताना अनेक वाचनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यांमुळे दररोज ठिकठिकाणी अपघातांची मालिका सुरु आहे. मात्र याकडे लक्ष द्यायला महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीला वेळ नसल्याचा आरोप वाहनचालकांनी केला आहे.
बुधवार दि. २४ रोजी दुपारी तीन ते साडेतीन वाजेच्या सुमारास आडगाव कडून द्वारकेच्या दिशेने जाताना के. के. वाघ कॉलेज ते आडगाव नाका दरम्यान असलेल्या उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे वाचविताना एकापाठोपाठ एक पाच चारचाकी वाहने एकमेकांवर आदळून झालेल्या अपघातांमध्ये वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये एम. एच. १८ ए. एक्स. ०७६७, एम. एच. १५ डी. एल. ०७१७, एम. एच. ४१ ए. एस. १४७२ या वाहनासह इतर दोन वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातामुळे उड्डाणपुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच काट्या मारोती पोलीस चौकीतील पोलीस हवालदार विशाल खाजेकर यांनी इतर कर्मचाऱ्यांसह धाव घेत अपघातग्रस्त वाहने बाजूला केली.
या उड्डाणपुलाला पडलेल्या मोठमोठ्या खड्यांमुळे अपघात झाल्याची माहिती निर्भय महाराष्ट्र पार्टीचे अध्यक्ष जितेंद्र भावे यांना मिळताच त्यांनी सहकारी राजेंद्र गायधनी, नितीन रेवगडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी तात्काळ अपघातस्थळी धाव घेत आंदोलन केले. यावेळी त्यांनी महामार्ग प्राधिकरण आणि टोल कंपनीचा निषेध करीत सुरु असलेल्या भ्रष्ट कारभाराचा जोरदार घोषणाबाजी करीत निषेध केला. तसेच, करोडो रुपये टोलच्या माध्यमातून वसूल केले जात असताना किमान रस्ते तरी चांगले देण्याची मागणी केली. टोल रस्ता आणि उड्डाणपुलावरील खड्डे तात्काळ न बुजविल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा दिला.





