विधानसभेच्या मतमोजणीसाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज ! - CHECKMATE NEWS
जिल्हा

विधानसभेच्या मतमोजणीसाठी नाशिक जिल्हा प्रशासन सज्ज !


शनिवारी नाशिक जिल्ह्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष !
नाशिक : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये नाशिक जिल्ह्यात ६९.१२ टक्के मतदान झाले असून जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघासाठी शनिवारी सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. यासाठी १५ मतमोजणीच्या ठिकाणी आवश्यक तयारी झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी दिली. तर दुसरीकडे आमदारकीची बाजी कोणकोण मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
शुक्रवार दि. २२ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार (निवडणूक) शाम वाडकर यांच्यासह अधिकारी होते.
जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले की, मतदानानंतर मतदान यंत्रे  संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या स्ट्राँग रूम मध्ये त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थेत सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेले आहेत. मतमोजणी निरीक्षक यांच्या उपस्थितीत ईव्हीएम मतमोजणीसाठी नियुक्त कर्मचारी यांची तिसरी सरमिसळ मतमोजणीच्या दिवशी म्हणजे शनिवार दि. २३ रोजी पहाटे पाच वाजता करण्यात येवून व संबंधित कर्मचाऱ्यांना टेबल नेमून देण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी सकाळी साडेसात वाजता निवडणूक लढविणारे उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी तसेच आयोगाकडून नियुक्त करण्यात आलेले मतमोजणी निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्राँग रूम उघडण्यात येईल. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम,१९५१ चे कलम १२८ अन्वये निवडणूक निर्णय अधिकारी सर्व कर्मचा्ऱ्यांना व मतमोजणी प्रतिनिधींना गोपनीयतेची शपथ देतील. भारत निवडणूक आयोगाकडून १५ विधानसभा मतदारसंघ निहाय मतमोजणी निरीक्षक नियुक्त करणेत आलेले आहेत. त्यांच्या निगराणीखाली मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे.
शनिवारी सकाळी ठीक आठ वाजता टपाली मतपत्रिकांची मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघ निहाय संभाव्य प्राप्त होणाऱ्या टपाली मतपत्रिका लक्षात घेऊन टेबलची संख्या निश्चित करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक व एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर जास्तीत जास्त ५०० टपाली मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे. सैनिक मतदारांमार्फत मतदान करून टपालाने प्राप्त होणाऱ्या मतपत्रिकांची मोजणी सकाळी आठ वाजेपूर्वी ETPBMS प्रणालीतून स्कॅनिंग करून करण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी ईव्हीएम मतमोजणी प्रक्रीया साडेआठ वाजता सुरू करण्यात येईल. याकरीता प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक व एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी शर्मा यांनी सांगितले. 

Translate »
error: Content is protected !!