पंचवटी परिसरातील कायदा सुव्यवस्था भंगली !
प्राणघातक हल्ले आणि चोरीच्या घटनांनी दहशत !
नाशिक : नाशिक शहरात गुन्हेगारीमध्ये वाढ होत असून, दुसरीकडे गेल्या काही वर्षांपासून शांत असलेल्या पंचवटी परिसर पुन्हा एकदा रक्तरंजीत होताना दिसत आहे. हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले, जबरी लूट, घरफोडी, वाहन चोरी, मोबाईल चोरी या नित्याच्याच घटना झाल्या आहे. याचे कुठलेच सोयरसुतक पोलिसांना दिसत नसल्याने गुन्हेगारांनी आता थेट कोयते आणि धारदार शस्त्रे घेऊन हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. तर महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे दिवसाढवळ्या लुटले जात असून, भाविकांना गोदाघाट परिसरात फिरणे मुश्किल झाले आहे. यामुळे पंचवटी परिसराची शांतता चांगलीच भंग झाल्याचे दिसत असून कायदा सुव्यवस्था व्हेंटिलेटरवर गेल्याचे दिसत आहे.
सेवानिवृत्त सहायक पोलीस आयुक्त दिनेश बर्डेकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक असताना पंचवटी परिसरातील गुन्हेगारी क्षेत्राचे चांगलेच कंबरडे मोडीत काढले होते. त्यांच्या कार्यकाळात कारागृहात डांबले गेलेले अनेक सराईत गुन्हेगार अद्यापही गजाआड आपले जीवन कंठीत आहे. तर जे जामीनावर बाहेर आले होते. त्यांनी बऱ्यापैकी गुन्हेगारी क्षेत्र सोडून दुसरा मार्ग अवलंबविला होता. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून पंचवटी परिसरातील कायदा सुव्यवस्था अक्षरशः खिळखिळी होऊन व्हेंटिलेटरवर गेली असल्याचे सुरु असलेल्या गुन्हेगारी कारवायांवरून दिसत आहे. दुचाकी चोरी आणि महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणारे गुन्हेगार मोकाट फिरत असून सामान्य नागरिकांना रस्त्यावर फिरणे मुश्किल झाल्याचे काही घडलेल्या घटनांवरून दिसत आहे.
फिर्यादी किरण सुभाष जाधव, ४२, रा. राहुलवाडी, पेठरोड हे त्यांचा चुलत भाऊ विजय सखाराम कराटे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी रविवार दि. ४ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास लक्ष्मण नगर पेठरोड येथे गेले होते. यावेळी याठिकाणी संशयित उदय सुनील चारोस्कर, अंकुश उर्फ पब्या अरुण गायकवाड, बाबू यादव, योगेश प्रकाश यंदे, राहुल शिवाजी शिंदे, खेमकुमार अजय यादव यांच्यासह अन्य दोघे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार का दिली म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी फिर्यादी किरण जाधव, गौरव अरुण रोकडे, आकाश भाऊसाहेब वाघचौरे हे वाद सोडविण्यासाठी गेले असता त्यांनाही जबर मारहाण संशयितांनी केली. यावेळी संशयितांनी हातातील कोयत्याने डोक्यात वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत घटनास्थळावरून पळ काढला. या प्राणघातक हल्ल्याची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित उदय चारोस्कर, योगेश यंदे, राहुल शिंदे, खेमकुमार यादव यांचा परिसरात शोध घेऊन त्यांना अटक केली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक रायकर करीत आहे.
तर दुसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी साहिल रंजित सावळे, २६, रा. क्षत्रिय चाळ, गजानन चौक, पंचवटी यांचा मित्र अमित दुबे याच्याशी रविवार दि. ४ रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास कृष्णनगर येथील हॉटेल चंद्राईच्या मागे संशयित गणेश भास्कर साळवे, २६,, रा. कृष्णनगर, उद्या जयंत जगताप, २६, रा. संजय नगर वाघाडी पंचवटी यांनी वाद घालत मारहाण सुरु केली. या मारहाणी दरम्यान संशयित उदय जगताप याने आपल्या जवळील धारदार शस्त्राने अमित दुबे यांच्या मानेवर वार करीत गंभीर दुखापत केली. तसेच, तुम्हाला पाहून घेतो म्हणून धमकी दिली. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार एस. पी. घुगे करीत आहे.
तसेच, तिसऱ्या घटनेमध्ये फिर्यादी साई सुधीर पाटील, १९, रा. बिडी कामगार नगर, अमृतधाम हा रविवार दि. ४ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मनपा शाळेजवळ उभा असताना संशयित वेदांत उर्फ वेद्या वाघ आणि सिद्धार्थ उर्फ भुऱ्या हेबांडे यांनी मागील भांडणाची कुरापत काढून साई पाटीलला जबर मारहाण केली. तसेच, रस्त्यावर पडलेला दगड साईच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. या घटनेची माहिती मिळताच आडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना संशयित गुंगारा देऊन फरार झाले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे फिर्यादी निकिता संकेत आहेर, २५, रा. हनुमान नगर आडगाव शिवार या सोमवार दि. ५ रोजी सकाळी पावणे नऊ वाजेच्या सुमारास रिक्षा मध्ये बसून प्रवास करीत असताना त्यांच्याशेजारी बसलेल्या अज्ञात चार महिलांनी त्यांच्या गळ्यातील १६. १२० ग्रॅम वजनाची ७० हजार रुपयांची सोन्याची पोत चोरून नेली आहे. तर, दुसऱ्या घटनेत फिर्यादी मंदाकिनी अरुण निकम, ५८, रा. इच्छामणी नगर, नांदूर नाका लिंकरोड या आपल्या नातीला क्लासवरून घेण्यासाठी सोमवार दि. ५ रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास स्वामी समर्थ नगर या ठिकाणी गेल्या होत्या. यावेळी दूरचाकीवरून आलेल्या अज्ञात दोघा संशयितांनी त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजन असलेली ७० हजार रुपयांची सोन्याची पोत खेचून पोबारा केला. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंचवटी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दिंडोरी नाका येथे फिर्यादी गौरव बाबुराव मोरे, ३२, रा. म्हसोबा वाडी, म्हसरूळ हा रिक्षाचालक सोमवार दि. ५ रोजी प्रवासी भरण्यासाठी उभा असताना संशयित पावन पुरुषोत्तम रामराजे याने तुला जास्त झाले आहे का, माझा नंबर असताना रिक्षा कसा भरत आहे अशी कुरापत काढून तीक्ष्ण हत्याराने डोक्याला मारून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, नाशिकमध्ये देवदर्शनासाठी आलेले दिनेश रामसनई गुप्ता, ५२, रा. जाजपूर, उडीसा हे संत गाडगे महाराज पुलाजवळील अमरधाम रोड येथील गोदावरी हॉटेल येथे मुक्कामी थांबले असता त्याचे मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण ४५ हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला आहे. तसेच, आडगाव शिवारातील फिर्यादी चेतना उमेश भाबड, ३४, रा. धात्रक फाटा यांच्या घराचा कांडीकोयंडा तोडून अज्ञात चोरटयांनी ४५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. गोदाघाटावरील साईबाबा मंदिराजवळ अंबादास महादू त्रिभुवन, ६२, रा. पवन नगर, सिडको यांची एम. एच. १५ ई. झेड. ८२१८ हि दुचाकी अज्ञात चोरटयांनी चोरून नेली आहे.





