पोलीस ठाण्यासमोर दोघा अल्पवयीन मुलांवर सशस्त्र प्राणघातक हल्ला !
शहरात गुंडाराज सुरु असल्याचा नागरिकांचा आरोप !जखमी मुलांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु !
नाशिक : एकीकडे भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा होत असताना सकाळच्या सुमारास शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर दोघा अल्पवयीन मुलांवर टोळक्याकडून सशस्त्र प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली आहे. हा सर्व प्रकार शाळकरी विद्यार्थ्यांसमोर घडल्याने त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र, पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोरच प्राणघातक हल्ला झाल्याने शहरात गुन्हेगारांचे साम्राज्य वाढल्याचे दिसू लागले असून, पोलिसांचे कुठलेही भय या गुन्हेगारांना राहिले नसल्याचे दिसत आहे.
शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी सर्व नागरिक भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत होते. अशाच पद्धतीने मराठा शाळेतील विद्यार्थी ध्वजारोहण करून सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घरी जात असताना अचानक एक टोळके दुचाकीवरून आले. आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर असलेल्या मराठा शाळेच्या गेटसमोर उभ्या असलेल्या पंचवटी परिसरातील पेठरोडवरील कर्णनगर आणि अनुसया नगर येथे राहणाऱ्या दोघा १७ वर्षीय मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. ही मुले मदतीसाठी आरडाओरड करत होते. यातच एका संशयिताने आपल्याकडील धारदार शस्त्र काढून त्याने या मुलांना भोसकण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या प्राणघातक हल्ल्यात हे दोघे मुले गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर अनेक वार करून या टोळक्याने घटनास्थळावरून पळ काढला. मात्र, प्राणघातक हल्ल्याची घटना पोलीस ठाण्यासमोर घडल्यानंतर देखील पोलीस आले नसल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या जखमी मुलांना एका रिक्षा चालकाच्या मदतीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्रथमोपचार घेतल्यांनंतर य दोघांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, हा सर्व प्रकार शाळेतील विद्यार्थ्यांसमोर घडल्याने या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
पोलीस आयुक्त कार्यालय पासून हाकेच्या अंतरावर आणि सरकारवाडा पोलीस ठाण्यासमोर प्राणघातक हल्ला झाल्याने पुन्हा एकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेविषयी नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्राणघातक हल्ल्याच्या घटनेमुळे शहरात गुंडाराज सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. तर, पोलीस फक्त अवैध धंदे चालकांकडून वसुली करण्यात दंग असल्याचा आरोप देखील सर्वसामान्य नाशिककरांकडून केला जात आहे.
जखमी मुलांपैकी एका मुलाच्या डाव्या पंजाला गंभीर दुखापत झाली आहे. तर दुसऱ्या मुलाच्या डोक्याला पाठीमागे, डाव्या दंडास, बगलेत आणि डाव्या पायाच्या मांडीला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या या दोघांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
सातपूर परिसरात खाजगी क्लासमध्ये बसण्याच्या किरकोळ कारणावरून अल्पवयीन मुलांनी हल्ला करीत क्लासमधील एका अल्पवयीन मुलाचा खून केल्याची घटना नुकतीच घडली होती. त्यात शहरात अनेक गन्ह्यांमध्ये अल्पवयीन संशयितांचा सहभाग उघड होत असल्याने हि चिंतेची बाब समोर येऊ लागली आहे. प्राणघातक हल्ल्यांसह, जबरी लूट, चोरी, वाहने चोरी, गोळीबार अशा घटनांमध्ये देखील अल्पवयीन गुन्हेगारांचा सहभाग उघड होऊ लागला आहे. यासाठी पोलीस प्रशासनानाने कठोर पाऊले उचलणे गरजेचे आहे. तसेच, अल्पवयीन गुन्हेगारी मागे कोणी मास्टर माईंड आहे का याचा देखील शोध घेणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.