चामर लेणीच्या पायथ्याशी अज्ञात व्यक्तीचा खून !
महिनाभरात खुनाची तिसरी घटना !पंचवटी परिसरात गुन्हेगारी वाढल्याने नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण !
नाशिक : नाशिकमध्ये खुनाचे सत्र सुरूच असून, रविवारी सकाळच्या सुमारास म्हसरूळ शिवारातील चामर लेणीच्या पायथ्याशी एका अज्ञात व्यक्तीचा अंगावर जखमा आणि रक्तभंभाळ अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत म्हसरूळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. तसेच, फॉरेन्सिक पथकाने देखील घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मारेकऱ्यांचा माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र, त्यांच्या हाती काहीही लागले नाही. खूनाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार (दि.२२) सकाळच्या सुमारास चामर लेणीच्या पायथ्याशी अज्ञात युवकाचा अर्धनग्न अवस्थेत मृतदेह पडलेला असल्याची माहिती म्हसरूळ पोलिसांना काही जागरूक नागरिकांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण, गुन्हे शोध पथकाचे कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले. यावेळी मृत युवकाच्या डोक्यात आणि शरीरावर ठिकठिकाणी जखमा आढळल्याने पोलिसांनी हा घातपाताचा प्रकार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. दरम्यान घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाला देखील पाचारण करण्यात आले होते. मात्र पाऊस पडला असल्याने श्वानपथकास गुन्हेगारांचा माग काढता अडचणी आल्या होत्या.
दरम्यान मारहाणीची घटना शनिवारी (दि.२१) रात्रीच्या सुमारास घडली असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मृत युवकाच्या मृतदेहापासून काही अंतरावर ब्लॅंकेट तर काही अंतरावर त्याची पॅंट सापडली आहे. परिसरात युवकासोबत झटापट झाल्याचे तेथील परिस्थिती वरून दिसून येत आहे. नेमका युवकाचा मृत्यू कशाने झाला याचे चित्र शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. २८ मे रोजी बुधवारच्या आठवडे बाजारात नंदलाल उर्फ सुरज जगतकुमार दास, १९ या युवकाचा वडिलांच्या खिशातून बळजबरीने पैसे काढण्यास विरोध केला म्हणून चौघा संशयितांनी नंदलाल याचा चॉपर भोसकून निर्घृण खून केला होता. तर पंचवटी परिसरातील फुलेनगर येथील गौंडवाडी येथील शाळा क्रमांक ५६ समोर सोमवार दि. २ रोजी मध्यरात्री बारा ते दोन वाजेच्या सुमारास संजय तुळशीराम सासे (४०, रा. घर न.१२८८, महालक्ष्मी चाळ, महाराणा प्रताप नगर, पेठ रोड, पंचवटी) याचा दगड-विटा आणि दारूच्या बाटलीने डोक्यावर आणि तोंडावर वार करून खून करण्यात आला होता. यासह पंचवटी परिसरात हाणामाऱ्या, प्राणघातक हल्ले, घरफोडी, जबरी लूट, चैन स्नॅचिंग, भाविकांची लूट, वाहन चोरी, धान्य चोरी यासह दिवसाढवळ्या घरफोडीचे गुन्हे वाढीस लागल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे.





