सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

सराफ व्यावसायिक बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ !


सराफाची दुचाकी चांदवड येथे बेवारस स्थितीमध्ये सापडल्याने चर्चांना उधाण !

नाशिक : नाशिक पुणे महामार्गावरील शिंदे गाव येथील रहिवाशी व सराफ व्यावसायिक सुशांत ज्ञानेश्वर नागरे हे गेल्या बारा दिवसापासून बेपत्ता झाले आहे. नागरे हे बेपत्ता झाल्याने शिंदे गाव तसेच नाशिक रोड परिसरात खळबळ उडाली असून संबंधित सराफाचा अद्यापही शोध न लागल्याने अनेक शंका कुशंकांनां उधाण आले आहे. बेपत्ता सराफ व्यावसायिकाचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. 
             याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिंदे गाव येथील रहिवासी सुशांत ज्ञानेश्वर नागरे,२७ यांचे शिंदे गाव येथे नायगाव रोडवर सराफ व्यवसायाचे दुकान आहे. रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी ते आपल्या वडिलांसोबत घरातून जाखोरी येथील शेतावर जाण्यासाठी निघाले होते. शेतीवर पोहोचल्यानंतर सुशांत नागरे हे वडिलांना म्हणाले की मी पाणी व खाण्यासाठी काहीतरी घेऊन येतो असे सांगून आपल्या दुचाकी गाडी ऍक्टिवावर निघून गेले होते. त्यानंतर दहा ते पंधरा मिनिटांनी सुशांत अजूनही का आला नाही म्हणून वडिलांनी चौकशी केली असता मी गावातच आहे येत आहे असे सांगून फोन बंद केला. त्यानंतर पुन्हा वडिलांनी वाट बघितली मात्र सुशांत आलेला नव्हता. त्यानंतर मात्र त्यांचे वडील ज्ञानेश्वर नागरे यांनी जाखोरी गावात येऊन चौकशी केली असता तिथे कुठेही सुशांत आढळून आला नाही.
          दरम्यान या घटनेनंतर त्यांचा भाऊ व नातेवाईकांनी सुशांतला फोन लावला असता मी इथेच आहे थोड्या वेळाने येतो असे सांगितले. त्यांनंतर पुन्हा दहा ते पंधरा मिनिटांनी फोन लावला असता सुशांतचा फोन बंद असल्याचे आढळून आले. सुशांत कुठेतरी गेला असावा किंवा दोन-तीन तासानंतर तो पुन्हा घरी येईल या आशेने घरचे नातेवाईक वाट बघत होते. परंतु संध्याकाळी सात वाजले तरी सुशांतचा फोनही बंद व तो कुठे आहे याबाबतचा संपर्क होत नव्हता. त्यामुळे नातेवाईक व मित्रपरिवार घाबरले व शोध घेण्यास सुरुवात केली. तरीही कुठे न आढळल्याने अखेर त्यांनी नाशिक रोड पोलीस स्टेशन गाठले व सुशांत बेपत्ता असल्याची खबर दिली.
          दरम्यान सुशांत यांची दुचाकी गाडी दुसऱ्या दिवशी चांदवड येथील बस स्थानक परिसरात बेवारस आढळून आली. त्यानंतर सुशांतचा नाशिक शहर, नाशिक रोड तसेच ग्रामीण भागात इतर ठिकाणी शोध घेण्यात आला. त्याचप्रमाणे मित्रपरिवार व नातेवाईक यांच्याशी संपर्क साधून शोध घेतला. मात्र, सुशांत कुठेही आढळून आला नाही. त्यानंतर मनमाड, चांदवड, मालेगाव तसेच राज्याच्या काही भागात व परराज्यात शोध घेण्यात आला व माहिती घेतली तरी सुशांतचा अजूनही संपर्क होऊ शकला नाही. त्याचप्रमाणे तब्बल गेल्या बारा दिवसापासून त्याचा फोन बंद असल्याने व संपर्क होत नसल्याने नातेवाईक व मित्रपरिवार हवालदिल झाला आहे.
            सुशांत नागरे बेपत्ता झाल्यानंतर नाशिक रोड पोलीस सुद्धा त्याचा शोध घेत आहे. परंतु अद्यापही कुठे आढळून आला नसून यासंदर्भात पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष पाटील व त्यांचे सहकारी सुशांत याचा शोध घेत आहे.

Translate »
error: Content is protected !!