बेद टोळीला मोक्का ; दीपक बडगुजरचा समावेश झाल्याने एकच खळबळ !
निवडणुकीच्या तोंडावर शहर पोलिसांचे मोक्का अस्त्र बाहेर !बडगुजर यांना अडचणीत आणण्यासाठी षडयंत्र सुरु असल्याची चर्चा !
नाशिक : अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आपली दहशत कायम राहावी यासाठी काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या गुंडानी टोळ्या बनवून आपली दहशत सुरु केली होती. यातील बेद टोळीविरुद्ध पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मोक्का अस्त्र उगारले आहे. सिंडिकेट करून सामान्य नागरिकांना वेठीस धरणाऱ्या बेद टोळीतील सात जणांचा या मोक्का कारवाई मध्ये समावेश आहे. विशेष म्हणजे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्या मुलाचा देखील मोक्कात समावेश करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यापुढेही शहरातील कायदा सुव्यवस्था आणि शांतता भंग करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त कर्णिक यांनी दिला आहे. या टोळीविरोधात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी अधिनियम १९९९ (मोक्का) कलम ३ (१) (२), ३(२), ३(४),यांच्यासह ३०७, ३४, १२० (ब), ३/२५ आर्म ऍक्ट ही वाढीव कलमे लावुन मोक्का कायदयाअंतर्गत ठोस कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून या बेद टोळीतील सदस्यांनी टोळीच्या माध्यमातून संशयितांनी संगनमत करून नागरिकांना जिवे मारण्याची धमकी व मारहाण करून बळजबरीने खिशातील पैसे काढुन घेणे, हातात धारधार शस्त्र घेऊन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, धारधार शस्त्राने सामान्य नागरीकांच्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडून नुकसान करून परिसरात दहशत निर्माण करणे, गंभीर दुखापत करणे, दरोडा टाकुन लोकांची लुटमार मारणे, जबरी चोरी करणे, जबरी चोरी करतांना दुखापत करणे, घरफोडी, चोरी, अनाधिकृतपणे प्रवेश करणे, खंडणी मागणे अशा प्रकारचे विविध प्रकारचे गंभीर गुन्हे या बेद टोळीतील संशयितांविरोधात उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड पोलीस ठाण्यांमध्ये २१ गंभीर गुन्हे दाखल आहे. गुन्हयातील टोळी प्रमुख आणि सदस्य यांनी नियोजीतबध्द कट रचुन गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या गुन्हेगारी टोळीची गुन्हेगारी कुंडली काढून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी थेट मोक्का अस्त्र बाहेर काढत या टोळीला मोक्का लावला आहे.
यामध्ये टोळीचा मुख्य सूत्रधार संशयित मयूर चमन बेद, ३७, फर्नांडीसवाडी, जयभवानी रोड, नाशिकरोड, नाशिक याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्य बारक्या उर्फ श्रीकांत माणिक वाकुडे, ३२, रा.जेतवन नगर, नाशिकरोड, नाशिक. टक्या उर्फ सनी रावसाहेब पगारे, ३१, बुद्ध विहारच्या मागे जेतवन नगर, जय भवानी रोड, नाशिकरोड, नाशिक, आकाश आनंद सूर्यताल, २४, रा. पंचशील नगर, शिवाजी नगर, नाशिकरोड, प्रसाद संजय शिंदे, २९, रा, शिवतेज चौक, नांदूर गाव, नाशिकरोड, परिणय उर्फ अंकुश लक्ष्मण शेवाळे, २९, रा. लक्ष्मी चौक, सिडको आणि दीपक सुधाकर बडगुजर, रा, सावतानगर, सिडको, नाशिक यांच्यावर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. यातील जवळपास सर्व संशयित सध्या कारागृहाची हवा खात असून, दीपक बडगुजर हा फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्यासाठी सज्ज झाले आहे. त्यातच त्यांचा मुलगा दिपक याच्याविरोधात सुपारी देऊन गोळीबार केल्याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पश्चिम मतदार संघात बडगुजर यांचे चांगले प्राबल्य आहे. तसेच, ते यंदा आमदार म्हणून निवडून येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. त्यामुळेच ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुधाकर बडगुजर यांना अडचणीत आणले जात असून त्यांच्या विरोधात षडयंत्र रचले जात असल्याची चर्चा परिसरात सुरु झाली आहे.





