मागे वळून पाहताना : दंगलीची महिनापूर्ती !
खरंच पोलिसांच्या दाव्यानुसार दंगल नेतृत्वहीन होती का ?
नाशिक : नाशिकमध्ये उसळलेल्या दंगलीला आज एक महिना पूर्ण झाला. पोलिस आणि काही माध्यमांच्या दाव्यानुसार अचानक उसळलेल्या दंगलीला चेहरा नव्हता, आणि हा नसलेला चेहरा रेखाटण्यासाठी दोन्ही बाजूच्या अनेक निष्पाप युवकांवर दंगलीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. शहरात शांतता रहावी यासाठी, यातील दंगलखोरांना तडीपारही करण्यात आले आहे. दंगली नंतरच्या महिनाभरात कायदेशीर कारवाईच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. त्यातच सोमवारी ईद- ए-मिलाद आणि मंगळवारी गणेश विसर्जन अशा दोन मिरवणूका निघणार असल्याने पोलीस प्रशासनाने आपल्या पातळीवर आवश्यक ती खबरदारी घेतली असली तरी दुर्दैवाने एखादी अनपेक्षित घटना घडलीच तर त्यामागचा चेहरा ऐन वेळी शोधण्याची वेळ येऊ नये यासाठी आतापासूनच चेहरा नजरेच्या टप्प्यात ठेवून महिनाभरापूर्वी अनावधानाने झालेली चूक टाळता येणे शक्य आहे.
अर्थात प्रथम दर्शनी यासाठी पोलीस प्रशासनाने देखील कंबर कसली असून हजारो पोलीस अधिकारी आणि कर्मचारी रस्त्यावर बंदोबस्तासाठी उतरले आहेत. या मिरवणुकांवर नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. मात्र, तपास यंत्रणेच्या दाव्यानुसार चेहरा नसलेल्या दंगलीतील गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाई करताना कुठले निकष वापरले जात आहेत, सीसीटीव्हीत दिसणारे चेहरे हाच एकमेव निकष पकडून कारवाई होत असेल तर, घटनास्थळावर असलेल्या संशयितांची उपस्थिती, दंगलीच्या नेमक्या वेळेचे या संशयितांचे निश्चित लोकेशन या साऱ्या बाबी पोलिस प्रशासनाने पडताळून घेतल्या आहेत का ? या प्रश्नांचा धांडोळा घेणे माध्यमांची जबाबदारी आहे. ती जबाबदारी पार पाडताना निर्माण होत असलेल्या काही शंका उधृक्त केल्याने तपास यंत्रणेला देखील दंगलीचे नेतृत्व करणारा खरा चेहरा शोधणे सहज सोपे होईल. हाच उद्देश असल्याने कायद्याच्या रक्षकांनी सकारात्मक विचार करावा एव्हढीच अपेक्षा आहे.
एखाद दुसरा अपवाद वगळता दंगल कधीही अचानक घडत नाही आणि नेतृत्वहीन नसते असा आज पर्यंतच्या दंगलीचा इतिहास आहे. ज्या दंगली अचानक घडतात, त्यात दगडफेक, किंवा जीवघेणी शस्र दिसत नाही म्हणून त्या दंगलीला चेहरा नसलेली दंगल म्हणता येऊ शकते. १६ ऑगस्ट रोजी घडलेली दंगल अचानक घडली असा दावा करणे म्हणजे तपासाचा ताण हलका करून जबाबदारी झटकणे, कुणाच्या तरी दबावाखाली तपास करणे किंवा गांगरल्यामुळे तपासाची दिशा सापडत नाही म्हणून दिसेल त्याला गुन्हेगार म्हणून ताब्यात घेणे. यापैकी एखादे किंवा ही सारी कारणे सध्या सुरु असलेल्या तपासामागे असावेत असे सामाजिक मानसिकतेचा अभ्यास असणाऱ्या जाणकारांचे मत आहे.
या दंगलीला चेहरा नव्हता, म्हणून दंगलीचे नेतृत्व कुणी केले हे शोधणे कठीण आहे हा दावाच मुळी हास्यास्पद आहे. दंगल का घडली ? या प्रश्नाचे उत्तर शोधताना जेव्हढे खोलात जाऊ तसे तसे एक एक कारण समोर येईल. अशा प्रकारच्या दंगलीसाठी दोन गट समोरासमोर यावे लागतात. दोन्ही गटामध्ये कुठल्या तरी मुद्द्यावर मतभेद निर्माण होऊन घोषणाबाजी, शाब्दिक चकमक व्हावी लागते. त्यानंतर बाचाबाची, हाणामारी, दगडफेक आणि कधी कधी जीवघेण्या शस्रांचा वापर होतो. आता या दंगलीत एका अर्थाने तशा जीवघेण्या शस्रांचा वापर झाला नसला तरी दगड फेकीपर्यंत जेजे आवश्यक आहे तेते सारे या दंगलीला लागू पडते, तरीही दंगलीला चेहरा नाही, असे म्हणणे हास्यास्पदच. चेहरा नव्हता तर हे दोन्ही परस्पर विरोधी, तत्कालीन ज्वलंत मुद्द्यावर तीव्र मतभेद असलेले गट समोरासमोर कुणी आणले ? किंबहुना ते समोरासमोर येणार नाहीत यासाठी खबरदारी का घेतली नाही ? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे कष्ट घेतले तरी एखादा लपलेले ला किंवा लपवलेले चेहरे नजरेत येतील. दंगल अचानक घडली असा ज्यांचा दावा आहे, त्यांनी दंगलीमध्ये अचानक दगड कसे आणि कुठून आले ? दगडफेकीला प्रोत्साहन कुठून मिळाले ? दंगलीला दिशा कोण देत होते ? या प्रश्नांची उत्तरे तपास सोपा करू शकतात.
बांगलादेश येथे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाच्यावतीने १६ ऑगस्ट २०२४ रोजी नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. त्याच दिवशी मुस्लिम समाजाकडून एका महंतांनी पैंगबरांविषयी झालेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त होत होता. तत्पूर्वी काही दिवसांपासून दोन्ही बाजूच्या सामाजिक राजकीय पुढाऱ्यांकडून परस्परविरोधी विधाने होत असल्याने नाशिकसह राज्यात न दिसणारा धार्मिक तणाव होता. या साऱ्या बाबी लक्षात घेऊन हे प्रकरण हाताळले गेले का ? हाही प्रश्न आहे. या दंगलीतील दगडफेकीमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही नागरिकांसह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले. याच दरम्यान पिंपळ चौक येथे उभ्या असलेल्या चारचाकी वाहनावर काही अज्ञातांनी दगडफेक करत वाहनाच्या काचा फोडल्या. याच परिसरात भाजपचे पदाधिकारी बबलू परदेशी यांच्या घरावर हल्ला करत त्यांना व त्यांच्या भावाला घरात घुसून गंभीर मारहाण करत जखमी करण्यात आले होते. या हल्ल्यात बबलू परदेशी यांच्या डोक्याला मार लागल्याने रक्तबंबाळ झाले होते. तर त्यांच्या घरावर लाठ्या काठ्यांनी आणि दगडाने हल्ला केल्याने बाहेर लावलेले फलक वस्तूंचे नुकसान झाले होते.
या दंगलीनंतर पोलीस प्रशासन ऍक्शन मोड मध्ये आले आणि त्यांनी सीसीटीव्ही, सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांवर प्रसारित झालेल्या फुटेजची तपासणी करीत दंगलखोरांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. यामध्ये दोन्ही बाजूच्या जवळपास साडे तीनशे ते चारशे दंगलखोरांवर गुन्हे करण्यात आले आहे. यातील जवळपास २७ दंगलखोरांना अटक करण्यात आली असून, यातील काही अजूनही गजाआड आहेत. तर अनेकांची ओळखपरेड पोलिसांकडून सुरु आहे. ज्या दंगलखोरांना न्यायालयाने जामीनावर सोडले आहे. त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करून शहर परिसरातून बाहेर काढण्यात आले आहे. सध्या या घटनेला महिना उलटला असून सध्या सर्वत्र शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना चांगले यश आलेले दिसत आहे. मात्र काही निष्पाप दंगल संपल्यानंतर घटना स्थळी आले, काही कामावरून घरी परत जात असताना, तर काही रस्त्यातील दगड बाजूला करताना पोलिसांनी केवळ घटनास्थळी आढळले म्हणून त्यांना दंगलखोर घोषित केले त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. किमान अशा काही निर्दोष तरुणांचे दंगल काळातील त्यांचे लोकेशन तपासून त्यांचा दोष कितपत आहे याची खातरजमा करावी एव्हढीच अपेक्षा आहे.
वादग्रस्त वक्तव्य करण्यात आल्याने महाराष्ट्रात काही ठिकाणी याविरोधात जुलूस काढण्यात येत होते. तर काही ठिकाणी या वक्तव्याला पाठिंबा देण्यात येत होता. त्यामुळे महाराष्ट्राचे वातावरण ढवळून निघाले होते. असे असताना पोलीस अधिकारी म्हणतात की, दंगल ही पूर्वनियोजित नव्हती. मग दगडफेक झाली कशी, एका गल्ली बोळातील चौकात अचानक इतक्या मोठ्या प्रमाणात दगड आली कुठून, रॅलीला परवानगी नव्हती तर संवेदनशील परिसरात रॅलीला जाण्यापासून पोलिसांनी रोखले का नाही, दुचाकी रॅली संवेदनशील परिसरात जात असल्याचे दिसताच योग्य खबरदारी घेण्यात का आली नाही, जे चौक दंगल झाल्यानंतर प्रवेशास बंद करण्यात आले ते रॅलीला अटकाव करण्यासाठी केले का नाही, दंगलीच्या काही वेळ अगोदर आलेल्या स्वयंघोषित नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ का करण्यात आली असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित केले जात आहे.
भद्रकाली परिसरात वातावरण बिघडल्याचे मॅसेज शहरात पसरले आणि शहरातील विविध भागातून तरुणाचे जत्थेच्या जत्थे जुन्या नाशिकच्या दिशेने आले. मात्र, हे जमावाकडून फक्त घोषणाबाजी करण्यात येत होती. कुठलाही अतिरेक केला जात नव्हता. मात्र, याठिकाणी काही वेळात स्वयंघोषित नेते दाखल झाले आणि त्यांनी दंगलखोरांना चिथावणी देत म्हसरूळ टेक कडे जाण्याचे आदेश देत दंगलीस पूरक वातावरण निर्माण केले. त्यानंतर हा संतप्त दंगलखोरांना घेऊन हे नेतेमंडळी पुन्हा शालिमारच्या दिशेने गेले आणि त्या परिसरात पुन्हा दगडफेक करण्यात आली. तरी देखील पोलीस म्हणतात आम्हाला नेतृत्व असे काही दिसून आले नाही. याला नेमके काय म्हणावे.
सोमवार दि. १६ रोजी ईद-ए-मिलाद आणि मंगळवार दि. १७ रोजी गणेश विसर्जन आहे. या दोन्ही सणांमध्ये मिरवणुका काढण्याची परंपरा आहे. त्यात गणेश विसर्जन मिरवणुका या देखील वाकडी बारव येथून काढण्याची परंपरा आहे. त्यामुळे या दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यासाठी इतर जिल्ह्यातून देखील विशेष पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला आहे. तर, काही अनुचित प्रकार घडल्यास पोलिसांकडून मिरवणूक मार्गांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे.





