मायलेकी एकटया लढल्या पुरुष षंढासारखे तमाशा बघत राहिले !
मदतीला कुत्रा आला धावून, पुरुषांची मर्दानगी गेली कुठे !
नाशिक : बदलापूर येथे शाळकरी मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना ताजी आहे. असे असताना दुसरीकडे आई-वडील हे मोठ्या प्रमाणावर आपापल्या पाल्यांची काळजी घेत आहे. गेल्या काही दिवसांपासून आपल्या मुलीची कोणी टवाळखोर छेड काढत असल्याचे लक्षात घेऊन मातेने रौद्र रूप धारण करत छेड काढणाऱ्यांना चांगलाच धडा शिकविल्याची घटना सिडको परिसरात घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्याने या प्रकरणाला वाचा फुटली आहे. मात्र, या घटनेदरम्यान मायलेकी एकट्या लढत असताना पुरुष मंडळी षंढासारखे उभे राहून तमाशा बघत राहिल्याचे चित्र मनाला चटका लावून जाणारे आहे. या प्रकरणी चार संशयितांवर कारवाई केली असून यातील एक संशयित अल्पवयीन आहे. या भागात पोलीस गस्त वाढविली जाणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सिडको भागातील शिवशक्ती नगर, डॉ.हेडगेवार चौक परिसरात चार पाच टवाळखोर आपली छेड काढत असल्याची बाब मुलींनी घरी सांगितली असावी यामुळे या रनरागिणी मातेने भर रस्त्यात टवाळखोरांना चांगलाच चोप दिला. या महिलेसह तिच्या मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र, असे असले तरी सीसीटीव्हीमध्ये टवाळखोरांना महिला आणि मुली चोप देत असताना एक कुत्रा पळत येऊन भुंकू लागल्याचे दिसत आहे. मात्र, आजूबाजूला अनेक पुरुष मंडळी हा तमाशा बघत उभे असल्याचे दुर्दैवी चित्र समोर आले आहे. या माय-लेकी एकट्या लढल्या मात्र, त्यांच्या मदतीला एकही पुरुष धावून आला नाही याला षंढपणा नाही तर काय म्हणावे. महिलांनी स्वसंरक्षणासाठी तयार व्हायला हवे असे संदेश सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून मुलींच्या हातात आता स्वरक्षणासाठी शस्त्रच दिले पाहिजे असे स्पष्ट मत नेटीझन्सच्या वतीने मांडण्यात येत आहे.
हेडगेवार चौकात बुधवार दि. २८ रोजी दुपारी पावणे दोन वाजेच्या सुमारास एक बाजूला चार ते पाच टवाळखोर उभे होते. यांनीच आपल्या मुलींची छेड काढली असावी असा विचार करून त्या मातेने तिच्या मुलीला फोन करून त्या ठिकाणी बोलवून घेतले. यावेळी मुलीसह अजून एक तरुणी दुचाकीवर आल्यानंतर या तिन्ही महिलांनी पुढे जात टवाळखोरांना लाथा बुक्यांनी चोप देण्यास सुरुवात केली. या नंतर या महिला काहीही न बोलता येथून निघून गेल्या. काही प्रत्यक्षदर्शींनी याबाबत अनेकांना माहिती दिली. त्यानंतर या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होताच हा प्रकार सर्वांसमोर आला आहे.
सगळा प्रकार सुरु असतांना येथून जाणाऱ्या माजी नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी बघितला. त्यांनी त्या टवाळखोरांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पळून गेले. याबाबत ढोमसे यांनी अंबड पोलिसांत तक्रार दिली असून, टवाळखोरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांच्या तक्रारीहून या घटनेप्रकरणी चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून यातील एक टवाळखोर अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मायलेकींचा टवाळखोरांविरोधात झालेला रुद्रावतार वाखाण्याजोगा म्हणायला हवा. कारण घरात खायला नसलेली मोकाट कुत्री रस्त्यावर लोकांच्या आईबहिणींची इज्जत काढण्यासाठी मोकाट फिरत असतात. अशा मोकाट कुत्र्यांना वेळीच आवर घालणे गरजेचे आहे. रस्त्यावर अबला महिला लढत असताना स्वतःला मर्द म्हणणाऱ्या पुरुषांनी शांत उभे राहणे समाजाच्या दृष्टीने कितपत योग्य आहे. याचाही विचार होणे गरजेचे आहे. कारण पुरुष मंडळींनी जर या टवाळखोरांविरोधात रस्त्यावर आले असते तर कोणत्याही मुलीची छेड काढण्याची हिंमत या टवाळखोरांची झाली नसती. अजूनही वेळ गेलेली नाही. सामान्य नागरिक हजारोंच्या संख्येने राहत असून, ही टवाळखोर मंडळी बोटावर मोजण्याइतकीच आहे. याचा विचार करून लढायला शिकणे गरजेचे आहे.





