बाजार समिती फसवणूक प्रकरणी महिला लिपिकाला अटक ! - CHECKMATE NEWS
नाशिक जिल्हा

बाजार समिती फसवणूक प्रकरणी महिला लिपिकाला अटक !


अधिकारी, कर्मचारी आणि काही संचालकांचा सहभाग असण्याचा पोलिसांना संशय !

नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक करून ९० लाखांचा अपहार केल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा अपहार केल्या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी तत्कालीन सचिव अरुण काळे यांना अटक केली असून याप्रकरणात पंचवटी पोलिसांनी बाजार समितीच्या महिला लिपिकाला अटक केली आहे. या अटकेमुळे बाजार समितीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. यामध्ये अजूनही काहींचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

             नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रकाश निवृत्ती घोलप यांनी संशयित आरोपी सुनील विश्वनाथ जाधव याने १ डिसेंबर २०२१ ते २४ मे २०२२ या कालावधी दरम्यान कृषी उत्पन्न बाजार समिती संस्थेच्या दप्तरात फेरफार करून संस्थेच्या नावाचे बनावट पावती पुस्तके तयार करून त्या बनावट पावती पुस्तकाच्या आधारे बाजार समिती फीची रक्कम वसूल करून त्या सर्व रकमांचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी करून कृषी उत्पन्न बाजार समिती नाशिक या संस्थेची एकूण ८९ लाख ७७ हजार २०० रुपयांचा अपहार करून आर्थिक नुकसान आणि विश्वासघात केल्या प्रकरणी एप्रिल २०२४ मध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. 

             दरम्यानच्या काळात बाजार समिती प्रशासकांनी संशयित सुनील जाधव याच्या कडून पैसे वसूल करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबत काळे याना आदेशित केले होते. मात्र, याकडे काळे यांनी दुर्लक्ष करून जाधव याला पाठीशी घालण्याचे काम केले म्हणून त्यांना आरोपी का केले नसल्याचे निर्देशित उच्च न्यायालयाने केले होते. त्यानुसार पंचवटी पोलिसांनी अरुण काळे यांना मंगळवार दि. ३० रोजी अटक केली होती. काळे यांना पहिले सहा दिवस आणि नंतर पुन्हा काळे हे तपास आणि चौकशीकामी सहकार्य करीत नसल्याचा जोरदार युक्तिवाद करीत बुधवार दि. ७ पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी वाढवून घेतली होती.
             या गुन्ह्याचा तपास करीत असताना पंचवटी पोलिसांना संशयित सुनील जाधव याला पावती पुस्तके देताना बाजार समितीमधील प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सह्या केलेल्या नसल्याचे दिसून आले. याबाबत सखोल तपास केला असता लिपिक सुजाता ढेरिंगे यांनी हे पुस्तके दिले असल्याचे उघड झाले आहे. त्यांनी पुस्तके देताना सह्या केल्या नसून त्याही या कटात सहभागी असल्याचे तपासात प्रथमदर्शनी निष्पन्न झाल्याने त्यांना पंचवटी पोलिसांनी ढेरिंगे यांना मंगळवार दि. ६ रोजी अटक केली आहे. या अपहार प्रकरणात महिला लिपिकाला अटक झाल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहे. यामागे अजूनही काही अधिकारी, कर्मचारी आणि काही संचालक यांचा सहभाग आहे का याचाही पोलीस अधिकारी तपास करीत असल्याची माहिती तपासी अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे यापुढे कोणाला अटक होणार याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागले आहे. 

Translate »
error: Content is protected !!