पुणेकरांवर जलसंकट वाढले ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

पुणेकरांवर जलसंकट वाढले !


खडकवासलासह इतर धरणातून मोठा विसर्ग !
पुणे : मुसळधार पावसामुळे तसेच खडकवासलासह इतर धरणातून केल्या जाणाऱ्या विसर्गामुळे पुण्यावरील जलसंकट कायम आहे. पूर परिस्थितीमुळे पुण्यात हाहाकार माजवला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सायंकाळी खडकवासला तसेच लोणावळा धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असल्यामुळे पूरपरिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता आहे. 
              हाती आलेल्या माहितीनुसार, खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये गुरुवार दि. २५ रोजी सायंकाळी ४० हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त करण्याची शक्यता असून नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच लोणावळा धरण परिसरात मुसळधार पर्जन्यवृष्टी होत असल्यामुळे धरण १०० टक्के भरले आहे. धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. 
             दरम्यान, राज्यातील विविध भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई पुण्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्याच्या परिसरात पावसाचा जोर वाढला असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी गुरुवारी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर केली होती. हवामान विभागाने येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने (रेड अलर्ट) या भागातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.सुहास दिवसे यांनी दिले होते. सायंकाळी मुळशी धरणातून ५ ते ७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून देण्यात आली आहे. पुण्यातील पूरस्थिती अटोक्यात आली नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एकता नगर परिसरात आढावा घेतला. यावेळी नागरिकांनी येथील अडचणींचा पाढा त्यांच्यासमोर वाचून दाखवला.

Translate »
error: Content is protected !!