महिला गांजा तस्कराला अटक
१० किलो गांजासह २.८० लाखांचा मुद्देमाल जप्त

प्रतिनिधी : नाशिक
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या पूर्वसंध्येला पंचवटी पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत थेट महिला गांजा तस्कराला अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तिच्याकडून सुमारे १० किलो २१५ ग्रॅम वजनाचा गांजा, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्य असा एकूण २ लाख ८० हजार ११० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या महिला आरोपीविरुद्ध यापूर्वी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास तपोवन कॉर्नर ते जुना आडगाव नाका जाणाऱ्या सर्व्हिस रोडजवळ, पंचवटी परिसरात एक महिला गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पंचवटी पोलिसांच्या गुन्हेशोध पथकाला मिळाली होती.
माहितीच्या आधारे पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन आंधळे, सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ व गुन्हेशोध पथकातील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी सापळा रचला.
यावेळी संशयित महिला लता उर्फ ताराबाई सोनुरामचंद्र चौरे (वय ४६, रा. वाल्मीकनगर, पाण्याच्या टाकीजवळ, वाघाडी, पंचवटी, नाशिक) हिला ताब्यात घेण्यात आले. तिची झडती घेतली असता तिच्याकडे १० किलो २१५ ग्रॅम वजनाचा गांजा सदृश्य अमली पदार्थ आढळून आला. पोलिसांनी हा मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत अंदाजे २ लाख १० हजार रुपये असून, मोबाईल, दुचाकी व इतर साहित्याची किंमत ७० हजार रुपये आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाठ करत आहेत.
ही कारवाई पोलीस हवालदार अमोल काळे, कैलास शिंदे, महेश नांदुर्डीकर, पोलीस शिपाई अंकुश काळे, विलास चारोस्कर, नितीन जगताप व महिला पोलीस अंमलदार रोहिणी भोईर यांच्या पथकाने केली.
मधुकर भैरू पगारे, २५, रा. राजवाडा, चांदोरी, सनी अनिल केतकर, २२, रा. राजवाडा, चांदोरी, ओम कांतीलाल देशमुख, २४, रा. सातपूर कॉलनी, नाशिक या तिघांना पंचवटी पोलिसांनी शुक्रवार दि. २६ रोजी दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास गोदाघाट परिसरातील रामसेतू पुलाखाली गांजा सेवन करताना आढळून आल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.





