सतीश शुक्ल यांची गच्छंती होताच केस कापून संकल्पपूर्ती !
शुक्लांच्या एककल्ली कारभाराविरोधात केस न कापण्याचा संकल्प !पुरोहित संघाचे सदस्य सदानंद राधाकृष्ण देव यांनी केला होता संकल्प !
नाशिक : पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्या एककल्ली आणि मनमानी कारभाराला कंटाळलेले पुरोहित संघाचे सदस्य सदानंद राधाकृष्ण देव यांनी गेल्या कुंभमेळ्यापासून जोपर्यंत सतीश शुक्ल अध्यक्ष पदावरून पायउतार होणार नाही. तोपर्यंत केस न कापण्याचा संकल्प केला होता. नुकत्याच झालेल्या बैठकीमध्ये शुक्लांची अध्यक्ष पदावरून गच्छंती करण्यात आल्यानंतर देव यांनी आपले केस कापून संकल्पपूर्ती करीत आपला आनंद व्यक्त केला आहे.
पुरोहित संघाचे माजी अध्यक्ष सतीश शुक्ल हे एककल्ली, मनमानी कारभार आणि पुरोहित संघ म्हणजे मीच अशा पद्धतीने गेली ३३ वर्ष आपल्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळत होते. यामुळे पुरोहित संघामध्ये मोठी अराजकता पसरली होती. याबाबत अनेक पुरोहितांनी उघड तर अनेकांनी एकांतात आपली नाराजी व्यक्त केली होती. अध्यक्ष बदलासाठी अनेकदा चर्चा झाल्या मात्र, त्या निष्फळ ठरल्या होत्या. यासाठी पुरोहित संघाचे सदस्य सदानंद राधाकृष्ण देव यांनी जोपर्यंत सतीश शुक्ल पुरोहित संघाचे अध्यक्ष राहतील तोपर्यंत मी केस कापणार नाही असा संकल्प गेल्या कुंभमेळ्यामध्ये केला होता. त्यानंतर त्यांनी आपले केस आजतागायत कापले नव्हते.
मात्र, बुधवार दि. ४ रोजी झालेल्या पुरोहित संघाच्या बैठकीमध्ये सतीश शुक्ल यांना अध्यक्ष पदावरून पायउतार करण्यात आले आणि त्यांच्या जागी नवनियुक्त अध्यक्ष म्हणून चंद्रशेखर पंचाक्षरी यांची एकमताने निवड करण्यात आली होती. त्यामुळे देव यांनी आपली संकल्पपूर्ती झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी लागलीच दुसऱ्या दिवशी आपल्या डोक्याचे आणि दाढीचे केस कापून संकल्प पूर्ण केला.
यावरून रामतीर्थ गोदावरी सेवा समिती या नवीन समितीचा अध्यक्ष बदलाच्या घटनेची कुठलाही संबंध नसल्याचे दिसून येत आहे. कारण गत कुंभमेळ्यापासून त्यांनी घेतलेला हा केस न कापण्याचा वसा आता पूर्ण झालेला आहे यावरूनच माजी अध्यक्षांचे एककल्ली कारभाराचा सर्व प्रकार चव्हाट्यावर आल्याची उघड आणि जोरदार चर्चा पुरोहितांसह संपूर्ण गोदाघाट परिसरात रंगली आहे.
सतीश शुक्ल हे बैठकीच्या दिवशी बाहेरगावी असल्याची चर्चा माध्यमांमध्ये रंगविण्यात आली होती. मात्र, अनेक पुरोहितांनी नाव न छापण्याच्या अटीवर बैठकीच्या दिवशी शुक्ल हे गोदा आरतीच्या वेळी उपस्थित राहून घोषणा देत असल्याचे फेसबुक लाईव्ह बघितल्यास उघड होईल आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, यावरून त्यांचा खोटारडेपणा सिद्ध होत असून, प्रत्येक वेळेस खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, पदाचा गैरवापर करायचा असा आरोप देखील सर्व सदस्यांनी केला आहे.
मनमानी, एककल्ली कारभार आणि पुरोहित संघ म्हणजे मीच अशा पद्धतीने सर्व पुरोहितांना हीन दर्जाची वागणूक देणे सतीश शुक्ल यांच्याकडून सुरु होते. यालाच कंटाळून मी केस न कापण्याचा संकल्प केला होता. तो आज मितीला पूर्ण झाला असल्याने केस कापले आहे. नवनिर्वाचित अध्यक्षांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहणार आहे. भविष्यात कायदेशीर लढा देखील उभारण्यात येईल आणि पुरोहित संघाचे काम सनदशीर मार्गाने पारदर्शीपणाने उभे करून सिहंस्थ कुंभमेळा उत्साहात साजरा करू. :सदानंद देव





सदानंद देव 