पदोन्नती टाळून माया जमविणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाचा धक्का !
पदोन्नती जलदगतीने करण्याचे शासनाचे आदेश !
नाशिक : शासनाने दिलेली पदन्नोती डावलून मलईदार पदावर बसणाऱ्या मनमानी करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या एका आदेशाने चांगलाच धक्का बसणार आहे. निवड सूची वर्षात पदोन्नती जलद गतीने करण्याचे हे आदेश देण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि महसूल विभागात मलाईदार पदावर ठाण मांडून बसलेल्या मुजोर अधिकाऱ्यांना पदोन्नती घेऊन काम करावे लागणार आहे. शासनाच्या या आदेशामुळे प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांमध्ये कही खुशी कही गम असे वातावरण पसरले आहे. पोलीस दलात पदोन्नती टाळण्याचे प्रकार जास्त असल्याची चर्चा यामुळे सुरु झाली आहे.
गेल्या काही वर्षांपासून शासन सेवेत असलेल्या आणि राजकीय वरदहस्त असणाऱ्या अधिकाऱ्यांनी पदोन्नती नाकारत मलाईदार पदावर ठाण मांडून बसल्याचे समोर आले आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० दिवसांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व राज्य शासकीय अधिकारी/कर्मचारी यांची पदोन्नती कार्यवाही जलदगतीने करण्याचे आदेश दिले आहे. याबाबत कार्यवाहीचा विविध विभागाच्या अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांची पदोन्नतीची माहिती सात दिवसात उपलब्ध करून देण्याचे सूचित करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश महाराष्ट्र शासनातील उप सचिव लीन संखे यांच्या स्वाक्षरीने सर्व मंत्रालयीन प्रशासकीय उपसचिव (आस्थापना) यांच्या नावाने काढण्यात आले आहे. त्यामुळे मलाईदार पदावर ठाण मांडून बसणाऱ्या अधिकाऱ्यांना चांगलाच धक्का बसणार आहे.
प्रशासकीय सेवेत असताना प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचारी अनेकदा पदोन्नती मिळविण्यासाठी वाट बघत असतात. तर दुसरीकडे प्रशासकीय सेवा बजावत असताना काही अधिकारी-कर्मचारी बेकायदेशीर मार्गाने माया गोळा करण्यात व्यस्त असतात. त्यांना पदोन्नती मध्ये कुठलाही रस नसतो. कारण पदोन्नती मिळाल्यास महिन्याच्या पगारामध्ये वाढ होऊन फक्त स्वाक्षरी करण्याचे अधिकार मिळत असल्याचा समज आहे. तसेच, खालच्या पदावर बसून थेट नागरिकांशी अथवा व्यावसायिकांशी कनेक्ट होऊन आपली तुंबडी भरण्यात अशा अधिकाऱ्यांना मोठा रस असतो. त्यामुळे असे अधिकारी राजकीय वरदहस्त डोक्यावर ठेवून पदोन्नती टाळत असतात. अशा मुजोर अधिकाऱ्यांना या आदेशामुळे पदोन्नती घ्यावी लागणार आहे.
पोलीस प्रशासनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक एका पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळत असताना संपूर्ण पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या अवैध व्यवसाय करणाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात हप्ते गोळा करीत माया जमावात असतात. त्यात पदोन्नती घेऊन सहायक पोलीस आयुक्त बनल्यास पोलीस निरीक्षक देईल ते पाकीट घेण्याचा एक अलिखित नियम सुरु आहे. त्यामुळे अनेक पोलीस निरीक्षक पदोन्नती टाळत असल्याचे दिसत आहे. सध्या नाशिक पोलीस दलात असे पोलीस निरीक्षक पदोन्नती टाळत माया जमविण्यात व्यस्त असल्याची चर्चा सुरु आहे.





