गुन्हेगारांचे मनोबल वाढले ; चोरटयांनी थेट क्रेन आणून बीएसएनएलची केबल केली चोरी !
शहरात सोनसाखळी चोरीसह चोरीचे सत्र सुरु !शहरातील पोलीस अधिकारी गेले कुठे नागरिकांचा संतप्त प्रश्न !
नाशिक : नाशिक शहरातील महिलांच्या गळ्यातील एकाच दिवशी एका तासात चार महिलांच्या अंगावरील सौभाग्याचे लेणे ओरबाडून नेल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी देखील सोनसाखळी चोरटयांनी आपला उपद्रव सुरु ठेवत आडगाव, भद्रकाली आणि अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करीत जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तर दुसरीकडे घरफोडी आणि चोरी करीत अज्ञात चोरटयांनी शहरातील विविध भागातून जवळपास १३ लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याने शहरात चोरट्यांची मोठी दहशत पसरली आहे. विशेष म्हणजे यातील एक चोरी तर क्रेन आणून तिच्या मदतीने थेट बीएसएनएलची लाखो रुपयांचीअंडरग्राउंड केबलच चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती आणि फिर्यादी ज्योती श्रीकांत जोशी, ६९, रा. अमृतधाम, पंचवटी, नाशिक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ज्योती जोशी या बुधवार दि. ६ रोजी संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास बिडी कामगार चौकातील शनी मंदिरासमोरून पायी घरी जात असताना पाठीमागून आपल्या दुचाकीवरील अज्ञात चोरटयांनी ज्योती यांच्या गळ्यातील ४९ हजार रुपये किंमतीची १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन मिर्ची चौकाच्या दिशेने फरार झाले. याबाबत आडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात सोनसाखळी चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर दुसऱ्या घटनेमध्ये सरला दिपक वाघले, ५५ रा. उपनगर नाशिक या गुरुवार दि. ७ रोजी सकाळी सव्वादहा वाजेच्या सुमारास सरला या त्यांच्या ओळखीच्या संजय तुरेकर यांच्या दुचाकीवरून जात असताना टाकळी रोडवरील म्हाडा इमारतीजवळ पाठीमागून एका दुचाकीवर अज्ञात तिघांनी येऊन सरला यांच्या गळ्यातील ६८ हजार रुपये किंमतीची १७ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र बळजबरीने ओढून तोडून नेत फरार झाले असून याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या घटनेमध्ये वर्षा प्रदीप शेलदार, ५१, रा. कामटवाडे, सिडको, नाशिक या गुरुवार दि. ७ रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास वर्षा शेलदार या आपली मुलगी लेखा हिच्या दुचाकीवरून पवननगर येथून भाजीपाला खरेदी करून जात असताना अचानक पाठीमागून आलेल्या दुचाकीवरील अज्ञात दोघा चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील ६५ हजार रुपये किंमतीची १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र घेऊन पोबारा केला असून याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनसाखळी चोरीचे सत्र सुरु असताना दुसरीकडे चोरटयांनी शहरात विविध भागात चोरी करीत लाखोंच्या मुद्देमालावर हात साफ केला आहे. यामध्ये विचित्र बाबूराम कुमार, २९, रा, दत्तमंदिर, नाशिकरोड यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे की, बुधवार दि. ६ रोजी रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास नाशिक रोड उड्डाण पुलासमोरील सुरेश किराणा दुकानाजवळ असलेल्या बीएसएनएलचे सिमेंटचे चेंबर खोलून एस. ए. थोरात नाव असलेल्या क्रेन वरील चालक आणि त्याच्या इतर साथीदारांनी ५ लाख रुपये किंमतीच्या १२०० पियर ची २५० मीटर युजी जेलीफिल्ड अंडरग्राउंड केबलचे दोन नग, १ लाख रुपये किंमतीची ८०० पियरची २५० मीटर जेलीफिल्ड अंडरग्राउंड केबलचे दोन नग, ७० हजार रुपये किंमतीची ४०० पियरची २५० मीटर युजी जेलीफिल्ड अंडरग्राउंड केबलचे दोन नग असे एकूण ६ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या केबल चोरून नेल्या आहे. या चोरीबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तसेच, महेश सुनील खैरनार, २७, रा. सावता नगर, सिडको, नाशिक हे शनिवार दि. २ ते गुरुवार दि. ७ रोजी पर्यंत घराला कुलूप लावून कोल्हापूर आणि गोवा फिरायला गेले होते. दरम्यान देवदर्शन करून गुरुवारी घरी परतले असता घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरटयांनी चोरून देव घरातील चांदीचे टाक, दागिने, घड्याळे, बेडरूम मधील लोखंडी कपाटातील २ लाख २३ हजार रुपये रोख असा एकूण २ लाख ५६ हजार ६२० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरटयांनी लंपास केल्याचे आढळून आले. घरोफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी अंबड पोलीस ठाणे गाठून गुन्हा दाखल केला आहे. तर कृष्णा नारायण गडकरी, २९, रा. मु. पो. शिवनई, ता. दिंडोरी, जि. नाशिक रविवार दि. ३ रोजी रात्री दोन ते तीन वाजेच्या दरम्यान गंगापूर रोडवरील डी. के. नगर येथील क्रांती कन्स्ट्रक्शन राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज येथील नवीन बांधकाम साईटवरून १ लाख ६५ हजार रुपये किंमतीच्या ५५ ॲल्युनियमच्या प्लेटा अज्ञात चोरटयांनी लंपास केल्या आहे. याबाबत गंगापूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे स्वाती विलास गांगोडे, ३५, रा. अनुसया नगर, पंचवटी यांच्या घराचे बुधवार दि. ६ रोजी सायंकाळी सहा ते गुरुवार दि. ७ रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी घरातील बेडरूम मधील लाकडी कपाटात ठेवलेले २ लाख ७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि १५ हजार रुपये रोख रक्कम लंपास केली आहे. याबाबत पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनसाखळी चोरटे पहिले पायी जाणाऱ्या एकट्या दुकट्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास करीत होते. मात्र, सध्या सोनसाखळी चोरटे थेट चालत्या गाडीवरील महिलांच्या अंगावरील सोनसाखळी आणि मंगळसूत्र चोरी करीत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे दुचाकीवरील महिलांच्या सोबत इतर व्यक्ती असताना आणि वर्दळीच्या असलेल्या भर चौकात सोनसाखळी चोरी करण्यात येत असल्याने या सोनसाखळी चोरट्यांना पोलिसांचा कुठलाही धाक उरला नसल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. मात्र, सोनसाखळी चोरीच्या सत्राने शहरातील महिलावर्ग मोठ्या दहशतीखाली आल्या आहे.





