महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले ! - CHECKMATE NEWS
महाराष्ट्र

महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल वाजले !


इच्छुकांची धाकधूक वाढली ; सत्तेत कोण येणार महायुती की महाविकास आघाडी ?

नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आजपासून राज्यात आचारसंहिता लागू झाल्याने राजकीय घडामोडीना वेग आला आहे. राज्यात एकूण टप्यात मतदान होणार असून या तारखेला निवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची चांगलीच धाकधूक वाढली आहे. निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून, २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा केली आहे. 

          गेल्या अनेक दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरु झाले होते. त्यामुळे पुढील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून विद्यमान आमदारांनी आपल्या मतदार संघात विकासकामांचा शुभारंभ करण्याचा धडाका सुरु केला होता. तर यामध्ये भविष्यात अनेक होणाऱ्या विकास कामांचे भूमिपूजन देखील करण्यात येत होते. लोकसभा निवडणुकांचे लागलेले धक्कादायक निकाल बघता अनेक विद्यमान आमदारांचे तिकीट कापले जाणार असल्याची चर्चा सुरु झाल्याने विविध पक्षांच्या नेत्यांच्या उरात धडकी भरली आहे. 
           महाराष्ट्र राज्यात राजकारणाचा चिखल झाल्याने पक्षांचे विविध गट निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीमध्ये मतदारांना कोणत्या पक्षाला आणि कोणत्या लायक उमेदवाराला मतदान करायचे याचा देखील कस लागणार आहे. सध्या शिवसेना फुटून शिवसेना शिंदे गट आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असे गॉन गट पडले आहे. तर राष्ट्रवादी फुटल्याने अजित पवार आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन गट तयार झाले आहे. सध्या राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीचे सरकार असून, विरोधी पक्षात काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस अशी महाविकास आघाडी बसलेली आहे. 
          निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्ताधारी महायुतीने मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक योजनांचा अक्षरशः पाऊस पाडला आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना, शेतकऱ्यांना वीज माफी, महिलांना बस भाड्यात पन्नास टक्के सवलत, वयोवृद्ध नागरिकांना मोफत प्रवास, मोफत धार्मिक पर्यटन यासह मुंबईत येणाऱ्या लहान वाहनांना टोल माफी देऊन सरकारने मतदारांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न केला आहे. तर, महाविकास आघाडीकडून लाडकी बहीण योजना चालूच ठेवून त्यात भर पाडणार असल्याचे आश्वासन दिले आहे. तसेच, महायुतीने घेतलेले चुकीचे निर्णय रद्द करणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मतदार कोणाच्या पारड्यात मतदानाचे दान करणार हे येत्या काळात मतपेटीतून सिद्ध होणार आहे. 
२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप – १०५, शिवसेना – ५६, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – ५४, भारतीय काँग्रेस पक्ष – ४४, बहुजन विकास आघाडी – ३, एमआयएम – २, समाजवादी पक्ष – २, प्रहार जनशक्ती पक्ष – २, भारतीय कम्युनिस्ट पक्ष – १, महाराष्ट्र नवनिर्माण सेना – १, शेतकरी कामगार पक्ष – १, स्वाभिमानी पक्ष – १, जनसुराज्य पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पक्ष – १, राष्ट्रीय समाज पक्ष – १ आणि अपक्ष १३  असे २८८ उमेदवार निवडून आले होते. 

Translate »
error: Content is protected !!