पोलिसांचा छुपा वरदहस्त, शिवतीर्थावर बाया नाचवल्या मदमस्त !
आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यास पोलिसांकडून वेळकाढूपणा !
नाशिक : दहीहंडीच्या उत्सवाआडून पोलीस प्रशासनाची कुठलीही परवानगी न घेता उच्च न्यायालयाचा अवमान करीत थेट रस्ता अडवून बाया नाचविण्याचा निंदनीय प्रकार पंचवटी परिसरातील शिवतीर्थावर घडला होता. शिवतीर्थावर बाया नाचवून झालेल्या गर्दीची तुलना थेट छत्रपती शिवरायांच्या जन्मोत्सवाच्या गर्दीशी केल्याने शिवभक्तांच्या भावना दुखल्या होत्या. याबाबत माध्यमांमध्ये वृत्त प्रसारित झाल्यानंतर देखील पंचवटी पोलिसांकडून आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे कायदे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठीच आहे का ? पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करीत आहे का ? असे प्रश्न देखील विचारले जात आहे.
शनिवार दि. ३१ ऑगस्ट रोजी पंचवटी कारंजावरील पोलीस चौकी समोर एका ग्रुपने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली होती. मात्र, रस्ता अडवून कार्यक्रम होणार असल्याने आणि नागरिकांना वेठीस धरले जाऊ शकते या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. मात्र, या ग्रुपने पोलिसांच्या नाकावर टिच्चून कार्यक्रमाच्या आदल्या रात्रीच भव्य स्टेज उभारणीचे काम सुरु केले होते. त्यानंतर शनिवारी दिवसा हा रस्ता बेकायदेशीररीत्या बंद करून स्टेज उभारणीचे काम सुरु केल्याने सर्वसामान्य नागरिकांना या रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला होता.
कुठलीही पूर्व सूचना नसल्याने मुख्य चौकातील रस्ता बंद केल्याने झालेल्या वाहतूक कोंडीमध्ये महाविद्यालयीन आणि शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अडकून पडले होते. तसेच, या परिसरात अनेक हॉस्पिटल असल्याने रुग्णांची देखील मोठी गैरसोय यावेळी झाली होती. संध्याकाळी तर हा रस्ता वाहतुकीसाठी बंदच करून टाकण्यात आल्याने वाहनधारकांच्या अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मिळेल त्या ठिकाणाहून रस्ता काढण्याच्या नादात छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये देखील वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र सर्वदूर दिसत होते. याबाबत वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना फोन केला असता त्यांनी आम्हाला कुठलेही आदेश नसल्याचे सांगत संबंधित जबाबदारी पंचवटी पोलीस ठाण्याची असल्याचे सांगत हात झटकले होते. मात्र, दुसरीकडे या बेकायदेशीर कार्यक्रमाला पंचवटी पोलिसांनी चांगला असा बंदोबस्त पुरवला होता. ज्या कार्यक्रमावर गुन्हे दाखल व्हायला हवे होते त्याच कार्यक्रमाला पोलिसांनी बंदोबस्त पुरविल्याने सर्वसामान्य नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला होता.
नियोजित असा बेकायदेशीर बाया नाचविण्याचा कार्यक्रम पोलिसांच्या उपस्थितीमध्ये उच्च न्यायालयाचा अवमान करीत स्थानिक पोलीस प्रशासनाला डावलून डीजेच्या गोंगाटात मनमानी पद्धतीने संपन्न करण्यात आला. हा कार्यक्रम होऊन दहा दिवस उलटत आले तरी पंचवटी पोलीस झोपेचे सोंग घेऊन बसलेले दिसत आहे. बेकायदेशीर कार्यक्रम करणाऱ्यांविरोधात कारवाईबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना विचारले असता त्यांनी बघू इतकेच उत्तर देत वेळ मारून नेली. त्यामुळे पंचवटी पोलिसांवर राजकीय दबाव आहे का ?, पंचवटी पोलिसांना आपले हितसंबंध जोपासायचे का ? की पंचवटीत या आणि काहीही करून जा असा एकप्रकारे संदेश द्यायचा आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांना पडले आहे.
पोलीस प्रशासनाने परवानगी नाकारलेली असताना संबंधित ठिकाणी स्टेज बांधण्यास पोलिसांनी वेळीच मज्जाव करायला हवा होता. मात्र, दिवसरात्र सुरु असलेल्या कामाला पोलिसांनी कुठेही खोडा घातला नाही. तसेच, कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सुमोटो पद्धतीने कारवाई करून नागरिकांना वेठीस धरणे, कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून उच्च न्यायालयाचा अवमान करणे, पोलीस प्रशासनाचे आदेश न मानणे याबाबत गुन्हे दाखल करणे गरजेचे होते. तसेच, याठिकाणी कर्णकर्कश आवाजात डीजे वाजविला गेला. मात्र, पंचवटी पोलिसांनी आवाजाची क्षमता देखील मशीनने तपासली नसल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे या बेकायदेशीर कार्यक्रमाला पोलिसांचीच मूकसंमती होती का ? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होते आहे.





