चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारांना पोलिसांकडून क्लीन चिट ?
अंबड पोलिसांकडून सात सोनसाखळी चोरीचे गुन्हे उघडकीस !दोघा संशयितांकडून साडेसतरा लाखांचा मुद्देमाल जप्त !
नाशिक : इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करणाऱ्या संशयितांना पोलिसांनी रंगेहात अटक केली होती. त्यांच्याकडून इंदिरानगर पोलीस ठाण्यात केलेले सोनसाखळीचे सात गुन्हे उघडकीस आले होते. या संशयितांचा ताबा अंबड पोलिसांनी घेतल्यानंतर त्यांनी देखील त्यांना पोलिसी खाक्या दाखवीत त्यांच्या दोन साथीदारांना अटक करून त्यांच्याकडून सोनसाखळीचे सात गुन्हे उघडकीस आणून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या चौदा सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील दोन दुचाकीसह १७ लाख ५८ हजार ५२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. मात्र, यातील चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारांना मोकाट सोडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी सॉरी करताना संशयित आरोपी परवेझ जावेद मणियार आणि विधिसंघर्षित बालक यांना पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून अटक केली होती. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात सोनसाखळी चोरी केल्याची कबुली दिली होती. तसेच, या गुन्ह्यातील ८१ ग्रॅम २९० मिलिग्रॅम सोने, एक दुचाकी असा एकूण ६ लाख ९८ हजार ५२४ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला होता. त्यानंतर या विधिसंघर्षित बालकाचा ताबा अंबड पोलिसांनी घेतला होता.
अंबड पोलिसांनी या विधिसंघर्षित बालकाकडे चौकशी केली असता त्याने आपले साथीदार शिवाजीनगर सातपूर येथे राहणारे संशयित मनोज संजय ओतारी, अक्षय सुनील बोरकर आणि दोन विधिसंघर्षित बालकांची नावे पोलिसांना सांगितली होती. त्यानुसार पोलिसांनी संशयित मनोज ओतारी, अक्षय बोरकर यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीती केलेले सोनसाखळीचे चोरीचे सात गुन्हे उघडकीस आणले आहे. तसेच, या संशयितांकडून १० लाख ६० हजार रुपयांचे १४ तोळे ३ मिलिग्रॅम सोने आणि एक दुचाकी हस्तगत केली आहे.
ही कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शरमाळे, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर, सहायक पोलीस निरीक्षक किरण रोदंळे, उपनिरीक्षक भूषण सोनार, उपनिरीक्षक झनकसिंग घुनावत, पो.ना. सागर परदेशी, पोना परदेशी, जगझाप, पो.शि. मुशरीफ शेख, योगेश जाधव, सौरभ माळी, प्रकाश नागरे व मपोअ. शामल जोशी, सचिन करंजे, अनील गाढवे, तुषार मते, संदिप भुरे, बोडके, समाधान शिंदे, नितीन राऊत, सागर जाधव, घनश्याम भोये, निकम, पाटील, कुणाल राठोड, मयुर पवार, रूमाले यांनी केली आहे.
अंबड आणि इंदिरानगर पोलिसांनी उघड केलेल्या १४ सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील जवळपास २२ तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे. मात्र, हे सोने चोरटयांनी ज्या सोनारांना विकले होते. त्या सोनारांकडून फक्त सोने हस्तगत करण्यात आले असून त्यांना सहआरोपी करण्याऐवजी पोलिसांनी या सोनारांना मोकाट सोडले आहे. त्यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक हितसंबंध जोपासले गेले असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु झाली आहे. अशा पद्धतीने गुन्ह्यांची उकल करून वाहवा मिळविणे शक्य आहे. मात्र, सहआरोपीना मोकाट सोडल्यास न्यायालयात गुन्हा सिद्ध होण्यास अडचणी येत सराईत गुन्हेगार निर्दोष सुटत असल्याचे दुर्दैवी चित्र दिसत आहे. यावर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी जातीने लक्ष देऊन चोरीचे सोने घेणाऱ्या सोनारांना सहआरोपी करावी अशी मागणी पीडित नागरिकांकडून करण्यात येत आहे.





